x Durganavratri.in: Adhik Maas Katha Marathi Adhyay 10

Adhik Maas Katha Marathi Adhyay 10

अधिकमास माहात्म्य अध्याय दहावा

 (Adhik Maas Marathi Adhyay 10, Purushottam Maas Marathi Adhyay 10)


Adhik Maas Katha Adhyay 10 Marathi

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ गुरवे नमः ॥ जयजयाजी रुक्मिणीरमणा ॥ कृपासागरा दयाघना ॥ तव स्मरणें अघ नाशना ॥ जायं निरसून तात्काळ ॥ १ ॥

तुझिये नामीं उपजो प्रेमा ॥ हेची देई सर्वोत्तमा ॥ निशिदिनी आत्मयारामा ॥ भजन घडो अक्षयी ॥ २ ॥
आतां शक्ति नसे शरीरीं ॥ भजनही नव्हे क्षणभरी ॥ उसंत नाहीं या संसारीं ॥ आठवून अंतरीं पाय तुझे ॥ ३ ॥

परी न कंठेची काळ ॥ चित्तीं वाहें तळमळ ॥ केधवा येईल वोखटी वेळ ॥ नेणों कपाळ महाराजा ॥ ४ ॥
ऐका श्रोतेहो चतुर ॥ मलमास कथानक सार ॥ जें ऐकतां पापें अपार ॥ भस्म होती क्षणमात्रें ॥ ५ ॥

लक्ष्मीनारायण संवाद ॥ परिसा होऊनि सावध ॥ संस्कृत भाषेचे प्रबंध ॥ प्राकृतावबोध परिसावा ॥ ६ ॥
लक्ष्मी रुवाचय ॥ भगवन् ब्रूहि मे सर्व मलमासस्य यत्फलं ॥ उपवासस्य सायर्थ्यं येषां नास्ति मलिम्लुचे ॥ १ ॥
किंकर्तव्यं नरैस्तैस्तु कथं पाप क्षयोभवेत् ॥ तद्वदस्व सुरश्रेष्ठ कृपां कृत्वा ममोपरि ॥ २ ॥
लक्ष्मी म्हणे कृपावंता ॥ मागें निवेदिली उपोषण कथा ॥ परी जया आंगीं नसे सामर्थ्यता ॥ उपाय केउता तयातें ॥ ७ ॥
तयाने व्रत केवी कीजे ॥ परलोकीं कैसेंनि पाविजे ॥ येविषयी निवेदीजे ॥ कवण कीजे सार्थक ॥ ८ ॥
परिसोनिया ऐसें उत्तर ॥ वदता झाला शाङ्‍गधर ॥ येविषयींचा तो प्रकार ॥ श्रवण कीजे शुभानने ॥ ९ ॥
श्रीकृष्ण उवाच ॥ श्रृणु देवि प्रवक्ष्यामि व्रतं पापप्रणाशनं ॥ येषामुपोषणे शक्तिर्नास्ति किंचिच्चभक्षणे ॥ ३ ॥
तैरेकभुक्‍तं कर्तव्यं हविष्यान्नेन नित्यशः ॥ तथा मौनंच कर्तव्यं अनंतफलमीप्सुभिः ॥ ४ ॥
विष्णु वदे ते अवसरीं ॥ शक्ति नाही जयाते शरीरीं ॥ तयाचे व्रत श्रवण करीं ॥ कवणे परी आचरावे ॥ १० ॥
तयाने करावे हविष्यान्न ॥ वरी एक भुक्‍त करून भोजन ॥ करावें मौन्य धरून ॥ नसे अन्य साधन पैं ॥ ११ ॥
मौन्य भोजना ऐसें पाहीं ॥ साधन दुसरें नाहीं नाहीं ॥ तेणें माते जिंकिलें पाहीं ॥ ऐके नवाई आणीक ॥ १२ ॥
मौन्यें पापाचा क्षय ॥ मौन्यें सौभाग्य प्राप्त होय ॥ मौन्यें सर्व शांत होय ॥ निरसुनि जाय सर्व अरिष्टें ॥ १३ ॥
मौन्यें कलहाची हानी ॥ मौन्यें आयुष्य वर्धनी ॥ मौन्यें सौख्यातें पावनी ॥ मौन्यें भोजनीं सादर ॥ १४ ॥
त्रिकार्यातें असावें मौन्य ॥ स्नान होम आणि भोजन ॥ याचें फळ करीं श्रवण ॥ अति आदरें करूनियां ॥ १५ ॥
मौन्य केलिया स्नान ॥ कांतीं सुंदर तेजस्वी पूर्ण ॥ आणीक होय श्रीमान् ॥ करी स्नान मौन्येसी ॥ १६ ॥
होम करितां मौन्ये करून ॥ आयुष्य वृद्धि होय जाण ॥ आणीकही साधन ॥ करिता भोजन मौन्येसीं ॥ १७ ॥
स्नानें संतुष्ट होय जाण ॥ अग्नि संतुष्ट होमें करून ॥ मौन्यें करितां भोजन ॥ स्वयें नारायण संतुष्टे ॥ १८ ॥
प्रसन्न होतां वरुण ॥ दिव्य कांती होय तेणें ॥ होम करितां मौन्ये करून ॥ श्रीवर्धमान अग्नि करितां ॥ १९ ॥
नित्य भोजन करितां मौन्ये ॥ सायुज्यता पावे तेणे ॥ ऐसे मौन्ये भोजनाचे कारण ॥ केले कथन सकळिकां ॥ २० ॥
पंच प्राणाहुति करितां ॥ बोलो नये सर्वथा ॥ संपूर्ण भोजन करितां पापे नासती समूळ ॥ २१ ॥
ऐसे भोजन करितां पाहीं ॥ तयाते प्रायश्चित्त आणीक नाहीं ॥ प्रायश्चिते पापे दहन होई ॥ हा निर्णय शास्त्रीं असे ॥ २२ ॥
मौन्य भोजन करितां ॥ आणीक प्रायश्चित्त नलगे तत्वता ॥ पापे भस्म होती जाणत जाणता ॥ नसे असत्यता हे वाणी ॥ २३ ॥
ऐसे प्रतिदिनी जयाते घडत ॥ त्या येवढा नाहीं पुण्यवंत ॥ तयावरी मलमास जाला प्राप्त ॥ तरी अधिकाधिक पैं ॥ २४ ॥
आदौ संपूर्ण एकमास ॥ तो तंव अवघाची पुण्यदिवस ॥ तयामाजी विशेष ॥ तेंही निःशेष अवधारा ॥ २५ ॥
दशमी द्वादशी तिथी पाहीं ॥ पौर्णिमा अमावास्या तेही ॥ सर्वां वरिष्ट तिथी ह्याही ॥ शास्त्रीं नवाई बोलिली असे ॥ २६ ॥
इतुकिया तिथी वरुनी ॥ पर्वकाळ टाकिजे ओवाळुनी ॥ व्यतीपात वैधृती कल्याणी ॥ इतुकिया वरुनि वोवाळीजे ॥ २७ ॥
प्रत्यही जरी न घडे स्नान ॥ अथवा ब्राह्मणपूजन ॥ नक्त अथवा मौनीभोजन ॥ दीपदान यथाविधी ॥ २८ ॥
न घडे अपूपादी दान ॥ न घडे ब्राह्मण भोजन ॥ सत्पात्रीं न घडे गोदान ॥ तेची लक्षण ऐकें पां ॥ २९ ॥
इतुकेंही न घडे जरी ॥ त्रिरात्र व्रतातें स्वीकारी ॥ स्नानदान बरविया परी ॥ नक्त करी मौन्यभोजन ॥ ३० ॥
यासीं तो वेंचावें न लागे कांहीं ॥ कष्ट करावें स्वदेहीं ॥ तेणें तुष्टमान शेषशायी ॥ पर्व सर्वही कुलकल्याण पुढें ॥ ३१ ॥
हेंची व्रत नारदें केलें ॥ तयातें ज्ञान प्राप्त झालें ॥ सत्यवतीनाथें सेविलें ॥ विश्वामित्रादि भले मुनींद्र ॥ ३२ ॥
यांनीं केलें मौन्य व्रत ॥ तरीच पावलें ब्रह्मत्व ॥ ऋषीमंडळीमाजी महत्व ॥ प्राप्त झालें तयातें ॥ ३३ ॥
आधींच मलमास उत्तम ॥ त्यांवरी द्वादशी पर्व नेम ॥ वरी पूर्णिमा उत्तमोतम ॥ कैचा राहे पापलेशा ॥ ३४ ॥
सकळ दान केलियाचें फळ ॥ अथवा तीर्थ केलियाचें फळ ॥ किंवा पुरश्चरण मंत्रमंडल ॥ किंवा दिधलें पृथ्वीदान ॥ ३५ ॥
इतुकेही घडतां एकीकडे ॥ मौन्यभोजन जयातें घडे ॥ तरी ना तुळे तयातें न घडे ॥ सांगतों रोकडे श्लोकाधारें ॥ ३६ ॥
सर्व फलंच मौनेन तिथि नक्षत्रयोस्ततं ॥ इष्टापूर्तफलं तस्य मलमासेतु मौनतः ॥ ५ ॥
मौनव्रतीततो धन्यः स्नाने वै भोजनार्चने ॥ आजन्मतः कृतात्पापान्मुच्यते नात्रसंशयः ॥ ६ ॥
उपवासेन यत्पुण्यं जायते शतवत्सरात् ॥ तत्पुण्यं लभ्यते देवि मौनेनैकेनमानवैः ॥ ७ ॥
मासवरी उपोषण करितां पाहें ॥ शतसंवत्सराचें पाप जाये ॥ एकपर्वणी मौन्य भौजन होये ॥ तरी लाभ पाहे तितुकाची ॥ ३७ ॥
तयावरी पूर्णिमा तिथी ॥ स्नान दान घडे अतिथी ॥ वरी मौन्य भोजनाची रीती ॥ नाहीं गणती पुण्यातें ॥ ३८ ॥
येविषयीं पुरातन इतिहास ॥ श्रवण कीजे सावकाश ॥ बोलता जाला जगदीश ॥ त्याच्या भावार्थास परीस तूं ॥ ३९ ॥
पूर्वी अवंती नगरीं जाण ॥ वेदशर्मा नामें ब्राह्मण ॥ तपोतेजें देदिप्यमान ॥ सूर्यनारायण दुसरा तो ॥ ४० ॥
स्वाध्यायीं नित्यरत असें ॥ दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे ॥ स्वधर्माचारें काळ क्रमित असे ॥ लोलंगता नसे निजांगीं ॥ ४१ ॥
निर असतां निरहंकारी ॥ मत्सर कवणातेंही न करी ॥ प्राणीमात्रातें कृपा करी अपत्यापरी जीवमात्रीं ॥ ४२ ॥
तंव प्रवर्तला मलमास ॥ ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस ॥ म्हणे पदरीं संचय नसे धनास ॥ वाटे हव्यास धनाचा ॥ ४३ ॥
तयासीं उपाय कीजे कवण ॥ भिक्षा मागत न मिळे कण ॥ कोणी न देती वस्त्र जीर्ण ॥ मग द्रव्य कोठून प्राप्त होय ॥ ४४ ॥
फुकाचें न मिळे तक्रपाणी ॥ हे तंव सोलीव दुःखाची करणी ॥ पूर्ण दरिद्र कृपे करूनी ॥ दिधलें मजलागुनी भगवंतें ॥ ४५ ॥
जरी कष्टवावें शरीर ॥ तरी शक्ती नाहीं अपार ॥ उपोषण करावे निर्धार ॥ तरी अन्नगत प्राण ॥ ४६ ॥
क्षणभरी नसतां अन्न ॥ तात्काळ जाऊं पाहे प्राण ॥ पित्तक्षोभ होय तत्क्षण ॥ यालागीं उपोषण घडेना ॥ ४७ ॥
ऐशी चिंता करितां ह्रदयीं ॥ निजध्यास बैसला जीवीं ॥ म्हणे पुण्यलेश आमुचे दैवीं ॥ प्राप्त केवीं होऊं शके ॥ ४८ ॥
मुमुक्षु दशा दृढोत्तर ॥ आंगीं बाणतां साचार ॥ कृपाळू तो सर्वेश्वर ॥ द्रवले अंतर तयाचे ॥ ४९ ॥
स्वप्नीं येऊनियां श्रीअच्युत ॥ तया ब्राह्मणाते संबोधित ॥ म्हणे मी सांगतो निश्चित ॥ करी व्रत मौन्य तेव्हां ॥ ५० ॥
मौन्याची करावे स्नान ॥ मौन्यची कीजे हवन ॥ मौन्यची साधावे भोजन ॥ नलगे आन साधनाते ॥ ५१ ॥
परान्नाचा करीं त्याग ॥ मासमात्र नेम प्रसंग ॥ उपरी उद्यापन यथासांग ॥ तेणे श्रीरंग संतोषे ॥ ५२ ॥
ऐसे स्वप्न होतांचि निशीते ॥ येरू चाकाटला सभोवते ॥ म्हणे दृष्टांत दिधला भगवंते ॥ म्हणोन हर्षाते निजमनीं ॥ ५३ ॥
मग प्रतिदिनी व्रतारंभ ॥ करितां जाला स्वयंभ ॥ मौन्यव्रतीं अलभ्य लाभ ॥ लाभला भला तयाते ॥ ५४ ॥
प्रातःकाळीं नर्मदा तीरीं ॥ स्नानाते जातसे निर्धारी ॥ मौन्येचि येतसे माघारी ॥ याचना न करी कवणाते ॥ ५५ ॥
करुनि देवदेवतार्चन ॥ विधियुक्त जप अनुष्ठान ॥ सारूनियां होमहवन ॥ नक्त उपोषण करितसे ॥ ५६ ॥
अस्तमानीं करी भोजन ॥ स्वपंक्‍ती अतिथी जाण ॥ परी स्वप्न वचनीं भावार्थ धरून ॥ करी आचरण मौन्येसी ॥ ५७ ॥
धन्य ते सांसारिक जन ॥ जयातें घडे अतिथी जाण ॥ नको देवा ऐशीयाचें जिणे ॥ असाक्षी भोजन जयातें ॥ ५८ ॥
ऐसा नव्हे वेदशर्मा ॥ कर्म करी अकर्मा ॥ सदां सर्वकाळ सर्वोत्तमा ॥ भजन प्रेमा अगम्य ॥ ५९ ॥
संपूर्ण भरतां एकमास ॥ उद्यापन करी सायास ॥ चित्तीं धरूनि अति हव्यास ॥ मौन्यव्रतास संपविले ॥ ६० ॥
तया व्रतप्रभावे करून ॥ आरोग्य कांतिवर्धमान ॥ जरामृत्यु दूर होऊन ॥ पावे निर्वाण पदातें ॥ ६१ ॥
एवं नानाविधा भोगावरमत्तोहिचार्थितः ॥ दत्तामया सुमनसाव्रतेन परितोषिणा ॥ ८ ॥
मग तया विप्रालागीं पाहीं ॥ संतोषून शेषशायी ॥ विमान आणविले लवलाहीं ॥ उद्धरून नेला वैकुंठा ॥ ६२ ॥
इंद्र करीतसे सन्मान ॥ आपणा निकट बैसवून ॥ स्वर्गसुखाचे भोग संपूर्ण ॥ भोगिता झाला स्वयें पैं ॥ ६३ ॥
तो ब्राह्मण अद्याप वरी ॥ स्वर्गलोकीं वास करी ॥ साक्ष घेईजे श्लोकांतरीं ॥ नसे वैखरी अप्रमाण ॥ ६४ ॥
धन्यस्त्वं कृतकृत्यश्च येनेदंव्रतमुत्तमं ॥ मौनादिकं कृतं विप्रतस्येदं फलमीदृशं ॥ ९ ॥
इंद्रस्तमाहसंपूज्य देहिमे किंचिदीप्सितं ॥ मौनव्रतैकदिनजं फलं कृत्वा कृपांमयि ॥ १० ॥
सविप्रोऽद्यापि वैकुंठे वसते बहुसौख्यभाक् ॥ एवं कृत्वाधिके मौनंव्रती किं लभतेनवै ॥ ११ ॥
ऐसा तरला वेदशर्मा ॥ म्हणोन श्रवण केलें तुम्हां ॥ यालागीं भाविकहो धरूनि प्रेमा ॥ ह्रदयीं पुरुषोत्तमा ध्याईजे ॥ ६५ ॥
संकल्प विकल्प करून दूर ॥ मिथ्या जाणून संसार ॥ ह्रदयीं चिंता रघुवीर ॥ नेतसे पैलतीर दासातें ॥ ६६ ॥
जयाचें नाम घेतां जाण ॥ जळीं तरले हो पाषाण ॥ ते तंव निर्जीव कीं हो जाण ॥ परी महिमान नामाचें ॥ ६७ ॥
मग मानव देह तो सजीहो ॥ केवी न तरे पाहाहो ॥ परी एकनिष्ठेविण देवो ॥ केवी पावें दासातें ॥ ६८ ॥
पूर्ण भावार्थाविण सर्वथा ॥ कृपा नयेची अनंता ॥ यालागीं श्रोतेहो तत्वतां ॥ आचरावें व्रता निजनिष्ठें ॥ ६९ ॥
परम साधारण हें व्रत ॥ ऐश्वर्य आयुरारोग्य प्राप्त ॥ कृपा करूनि श्रीभगवंत ॥ निवेदिलें आदरें ॥ ७० ॥
तरी भगवद्भजनासीं अव्हेर ॥ केवी करावा साचार ॥ अव्हेरितां तयाचें उत्तर ॥ मग होय निष्ठुर दासातें ॥ ७१ ॥
पाहा उदरालागीं नीचसेवन ॥ करावें लागे जीवित्व अर्पण ॥ येथें केंचित पडतां न्यून ॥ क्षोभे दारुण सेवकातें ॥ ७२ ॥
आणि आपुली जे कांता ॥ पतिवचनातें आव्हेरितां ॥ मग तो कोपे तियेवरुता ॥ करी लत्ता प्रहारातें पै ॥ ७३ ॥
ऐसें विचारून मानसीं ॥ हा तो स्वामी त्रैलोक्यवासी ॥ अमान्य होतां त्याचिया वचनासी ॥ तरणोपाव केसेनि पावला ॥ ७४ ॥
म्हणोन प्रार्थितो बद्धहस्तीं ॥ विन्मुख न व्हावें भगवंती ॥ हेंची सांगणें पुढतो पुढती ॥ श्रोत्यांप्रती आदरें ॥ ७५ ॥
स्वस्ति श्री अधिकमास माहात्म ग्रंथ ॥ पद्म पुराणींचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ दशमोध्याय गोड हा ॥ १० ॥
ओंव्या ॥ ७५ ॥ श्लोक ॥ ११ ॥
 
॥ इति दशमोऽध्यायः ॥

Featured Post

Varuthini Ekadashi 2029 Date

Varuthini Ekadashi 2029 Date Varuthini Ekadashi is one of the important Ekadashi fasts observed in Hindu tradition. It falls during the  Kri...