Adhik Maas Katha Marathi Adhyay 11

अधिकमास माहात्म्य अध्याय अकरावा

 (Adhik Maas Marathi Adhyay 11, Purushottam Maas Marathi Adhyay 11)


Adhik Maas Katha Adhyay 11 Marathi

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदाशरथे रामचंद्रा ॥ अनाथनाथा करुणासमुद्रा ॥ कृपासमुद्रा नाममुद्रा ॥ अक्षयी नरेंद्रा मज देई ॥ १ ॥

हेंची मागणें पुढतो पुढती ॥ उचित दीजे रघुपती ॥ अंतीं राहूं दे स्फूर्ती ॥ भावना चित्तीं असों दे ॥ २ ॥
श्रोतियें श्रवण कीजे सावधान ॥ मलमाहात्म परम पावन ॥ जें ऐकतां कलिमलदहन || तात्काळ जाण होतसे ॥ ३ ॥

श्रीलक्ष्मीनारायण संवाद ॥ तोचि तुम्हांतें करवूं विशद ॥ आतां होऊनियां सावध ॥ श्लोकावबोध परिसावा ॥ ४ ॥

श्रीरुवाच ॥ मलिम्लुचे ह्रषीकेश पुराण पुरुषोत्तम ॥ पंचपर्वकृतं नृणां किं फलं स्याद्वदाच्युत ॥ १ ॥
लक्ष्मीवदेहो जगन्नायका ॥ विज्ञापना एक ऐका पंचपर्वाचा भाव निका ॥ कृपाकरूनि सांगिजे ॥ ५ ॥
पांच पर्षे तीं कवण ॥ काय तयांचें महिमान ॥ आचरलिया कवण पुण्य ॥ पूर्वी कवण आचरिले ॥ ६ ॥
हें समग्र मज कीजे श्रवण ॥ जें ऐकता सुखसंपन्न ॥ मग बोलो आदरिलें जाण ॥ स्वयें नारायण स्वामिराजा ॥ ७ ॥
श्रीकृष्ण उवाच ॥ श्रृणु देवि प्रवक्ष्यामि पर्वाणि तु यथाक्रमं ॥ वैधृतिश्चव्यतीपातोराकाचैवकुहुस्तथा ॥ २ ॥
मग वदे देवाधिदेवो ॥ पांच पर्वाचा अभिप्रावो ॥ वैधृती व्यक्तीपात पाहा हा ॥ केला निर्णयो शास्त्रातें ॥ ८ ॥
पूर्णिमा अमावास्या पाहीं ॥ द्वादशी उत्तम पर्व तेंहीं ॥ ऐसीं पंच पर्षे पाहीं ॥ ऐकें नवाई या अर्थी ॥ ९ ॥
व्यतीपातें जो धर्म घडे ॥ तेणें धर्मराज उभवि हुडे ॥ विधृतीं दान जरी घडे ॥ तरीं जोडे महापुण्य ॥ १० ॥
पूर्णिमेकरितां दान ॥ तेणें संतोषे चतुरानन ॥ अमावास्या पितृगण ॥ संतुष्टमान पैं होती ॥ ११ ॥
द्वादशी परम पावन दिवस ॥ तेणें संतोषे रमाविलास ॥ असो होमस्नानदानास संतोषे कमळालय ॥ १२ ॥
ऐसे तीर्थीं पर्वणी ॥ जे करिती होमहवनीं ॥ तया तुष्टमान चक्रपाणी ॥ यमजाचणी चुकवीत ॥ १३ ॥
वैधृती व्यतिपात पर्वणी ॥ देवा दुर्लभ पितृतर्पणी ॥ धन्यधन्य तयालागुनी ॥ न्यून सदनीं पडों नेदी ॥ १४ ॥
वैधृतौचाक्षयं पुण्यं संक्रात्यधिकमच्युत ॥ निमिषे निमिषेकांते वर्धते नात्र संशयः ॥ ३ ॥
मलमासे विशेषेण मत्प्रिये चारुहासिनि ॥ तस्य पुण्यप्रभावेन प्रल्हादो दैत्यनायकः ॥ ४ ॥
या वैधृतीचें अक्षयी पुण्य ॥ दिवसेंदिवस वर्धमान ॥ जेवी गौतमीषया लागून ॥ दिवसेंदिवस वृद्धी करी ॥ १५ ॥
यथेष्ट भक्ष मिळता तयेतें ॥ मगतें वृद्धि करी पयातें ॥ तैसे दानधर्म करितां वैधृतीतें ॥ होय पुण्यतें वृद्धिंगत ॥ १६ ॥
प्रतिमासाचिये ठायीं ॥ वधृती येतसे पाहीं ॥ परी विशेष महिमा राही ॥ पातलिया मलमास ॥ १७ ॥
याच वैधृती वरी दान ॥ नेमे करी प्रल्हाद आपण ॥ दैत्यकुळीं उपजोन ॥ मजलागून वश्ये केलें ॥ १८ ॥
नेमपूर्वक करितां दान ॥ राज्यप्राप्त शालें तया लागून ॥ ऐसें वैधृतीचें महिमान ॥ विशेषाहून विशेष ॥ १९ ॥
याचि पुण्याचरणें करून ॥ इंद्रपद वासवातें जाण ॥ लक्ष्मी नष्ट झाली पूर्ण ॥ ते लाधली संपूर्ण व्रतदानें ॥ २० ॥
पूर्वी मांधाता राजा सूर्यवंशीं ॥ परम धार्मिक पुण्यराशी ॥ इंद्रपद प्राप्त जालें तयासी ॥ तें वासवासि पदच्युत ॥ २१ ॥
तें काळीं स्वयें येऊन नारद ॥ इंद्रातें उपदेशिला व्रतावबोध ॥ वैधृती महिमा अगाध केला बोध इंद्रातें ॥ २२ ॥
तोची नेम धरून जीवेशीं ॥ सहस्त्रनयन आचरे भावेंसी ॥ म्हणोन प्राप्त झाला स्वपदासी ॥ निज आसनासी आपुलिया ॥ २३ ॥
म्हणोन वैघृती महिमान ॥ मज न वर्णवेची हो जाण ॥ कथिता जाला पंचवदन ॥ चतुरानन तोही पैं ॥ २४ ॥
याचा ऐकें दान महिमा ॥ कवणे परीं आचरावें नेमा ॥ तेंही सांगतों अनुक्रमा ॥ शास्त्राधारें बोलिलासे ॥ २५ ॥
वैधृतीसीं केलिया दान ॥ समग्र देवता संतुष्टमान ॥ घृतासहित पायसान्न ॥ कीजे अर्पण ब्राह्मणाते ॥ २६ ॥
अथवा शक्ति असलिया जाण ॥ यथासांग कीजे संतर्पण ॥ किंवा तिळपात्र घृतेंसीं जाण ॥ दीजे दान ब्राह्मणातें ॥ २७ ॥
तिळमिश्रित लाडू पाहीं ॥ षोडश असावे तेही ॥ कर्दळी फळें अर्पिजे बरवीं ॥ नेमयुक्त षोडश ॥ २८ ॥
खर्जूरी फळें षोडश असावीं ॥ किंवा पूगीफळें गणावीं ॥ भूसुरांतें अर्पावीं बरवीं ॥ पूजाविधानें करूनि ॥ २९ ॥
परी वैधव्य दुखः नसे देही ॥ वंध्या सुपुत्र लाधे पाहीं ॥ सदां आरोग्यता तेथें राहीं ॥ व्याधी नाहीं तिळमात्र ॥ ३० ॥
वैधृतौ दुःखसाकल्यवर्जितो सौभवेत्सदा ॥ पूगंपत्रं षोडशकं योदद्याद्वैधृतौनर ॥ ५ ॥
यापरी वैधृतीचे महिमान ॥ संकलित मार्गे केले कथन ॥ आतां ऐका हो सावधान ॥ व्यतीपात दान महिमा तो ॥ ३१ ॥
पूर्वी वराह पुराणाच्या ठायीं ॥ व्यतीपात कथा असे पाहीं ॥ प्रस्तुत संकलित मार्गे सर्वही ॥ सावध ऐकिजे भावार्थे ॥ ३२ ॥
धर्माधर्म याचा विस्तार ॥ सांगितलासे बहुत प्रकार ॥ समग्र कथा लागेल जर ॥ तरी होईल प्रसर ग्रंथातें ॥ ३३ ॥
म्हणोनी ध्वनितार्थ वाणी ॥ परिसवू श्रोतियांचे कर्णी ॥ संशय नाणिजे मनीं ॥ श्लोकाधारें वाणी वदतसे ॥ ३४ ॥
सर्वदानाधिकं पुण्यं व्यतीपात प्रभावतः ॥ प्रतिमासं विवर्धेत संख्यातेभ्यः शताधिका ॥ ६ ॥
कुरुक्षेत्रादि धर्मनृपति ॥ वनांतरीं असतां संकटवर्ती ॥ तयानें हें व्रत आचरता पुढती ॥ देशाधिपती पातलासे ॥ ३५ ॥
चंद्रसूर्यातें समानयोग ॥ प्राप्त होतां यथासांग ॥ तेथें व्यतीपात जन्म प्रसंग ॥ जाला निःसंग अवधारा ॥ ३६ ॥
म्हणोनि याचा विशेष महिमा ॥ वदोन गेला चतुर्मुख ब्रह्मा ॥ न भूतो न भविष्यति सीमा ॥ या पुण्यप्रभावातें ॥ ३७ ॥
कुरुक्षेत्राचिये ठायीं ॥ कनकदान ग्रहणसमयीं ॥ सूर्यपर्वणी दिधलें पाहीं ॥ तरी समता नाहीं व्यतीपाता ॥ ३८ ॥
चक्रतीर्थ अथवा काशी ॥ स्नानें मुक्ति प्राणियांसीं ॥ तेही साम्यता नाहीं यासी ॥ व्यतीपात दानासीं निर्धारें ॥ ३९ ॥
भाद्रपद अमावास्येसीं ॥ जरी स्नान घडे गंगेसी ॥ अथवा सोमवतीसी ॥ परी समता यासी नसेची ॥ ४० ॥
अथवा सूर्यग्रहण लक्षून ॥ केलें जरी जपानुष्ठान ॥ परी व्यतीपाता ऐसें पुण्य ॥ दुजे आन असेना ॥ ४१ ॥
धान्यं दत्तं व्यतीपाते हिरण्यं वाऽब्धिजे रवौ ॥ अनंत फलदं सर्वमग्निहोत्रफलं तथा ॥ ७ ॥
व्यतीपाता अर्पितां धान्य ॥ अनंत फळ लाभे पूर्ण ॥ तयाही वरी अग्निहोत्री पूर्ण ॥ देईजे विधीनें तयातें ॥ ४२ ॥
प्रतिमासें व्यतीपात परम ॥ अग्निहोत्रातें अर्पावें अन्न ॥ किंवा किंचित् अर्पून सुवर्ण ॥ तेणें जगजीवन संतुष्टे ॥ ४३ ॥
प्रातःकाळीं करून स्नान ॥ सारूनि देवदेवतार्चन ॥ मग ब्रह्मयज्ञादी सारून ॥ ब्राह्मणाते पाचारिजे ॥ ४४ ॥
उपरी नारीकेळ त्रयोदश ॥ अथवा कर्दळी फळविशेष ॥ खर्जुरी फळें त्रयोदश ॥ अर्पावी ब्राह्मणास आदरे ॥ ४५ ॥
जें जें फळ जये काळीं ॥ निर्माण होते ऋतुकाळीं ॥ तेंची अर्पी कां वनमाळी ॥ भावबळें आदरेंसी ॥ ४६ ॥
ऐसें सत्पात्रीं करितां दान ॥ होय पुण्य तें वर्धमान ॥ पापें जाताती भस्मोन ॥ जेवी तृण अग्निसंगें ॥ ४७ ॥
जालिया अनंत पापराशी ॥ असलिया पंच महादोषी ॥ तरी तात्काळची नाशी ॥ आचरतां व्रत ऐसिया ॥ ४८ ॥
अल्प वेंचा महापुण्य ॥ संकलित मार्गे केलें कथन ॥ नारी अथवा पुरुष जाण ॥ लाभ समान उभयतां ॥ ४९ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ सर्वी आचारावें निर्धार ॥ जयातें न घडे साचार ॥ तरी नरक अघोर चुके ना ॥ ५० ॥
परि पाहिजे आगळा भावार्थ ॥ तयानें जोडे परमार्थ ॥ भावेंविण श्रीअनंत ॥ नातुडे निश्चित जाणपां ॥ ५१ ॥
किंचित् भाव होतां न्यून ॥ तरीं दुरावे शेषशयन ॥ यालागीं निरहंकार होऊन ॥ कीजे दान भावार्थे ॥ ५२ ॥
अहंकार न साहे भगवंता ॥ तयातें ही स्वयें अहंकार होतां ॥ शिर गळाले तत्वतां ॥ हयग्रीव तो जालासे ॥ ५३ ॥
तेथे इतर जनाची वार्ता ॥ केवीं सामावे हे कथा ॥ यालागीं अभिमान सर्वथा ॥ नाणिजे वृथा मानसीं ॥ ५४ ॥
मी कर्ता ऐशिया वचनासी ॥ धरिता दुरावे ह्रषीकेशी ॥ आचरेल जे पुण्यराशी ॥ ते तंव नाशी क्षणार्धे ॥ ५५ ॥
आणीक असे एक ॥ कारण तेही ऐका नावेक ॥ जे व्रत आचरावे देख ॥ मध्यंतरीं न सोडावे ॥ ५५ ॥
कैसीही पडो दे काळवेळ ॥ परि न सोडावे व्रत अढळ ॥ मध्येंचि सोडितां निर्फळ ॥ होय तात्काळ सर्वही ॥ ५७ ॥
तस्मिन्मलिम्लुचेपाते येनकेनापिमानवैः ॥ दानं देयं विशेषेण संसारभयभीरुभिः ॥ ८ ॥
संसार सुफळ व्हावा ॥ वाटे जया जिवाभावा ॥ तयाने व्रतनेम करावा ॥ येर आभावा चाड नाहीं ॥ ५८ ॥
दुर्लभ नरदेह पाहीं ॥ शेवटीं नासोनियां जाई ॥ याचे सार्थक करावे कांहीं ॥ ऐसा न येई मागतां ॥ ५९ ॥
कृपाळू तो जगदीश्वर ॥ तयानें कथिलासे दानप्रकार ॥ अल्पवेंचें लाभ थोर ॥ करा व्यापार भावार्थे ॥ ६० ॥
उदरालागीं अन्यत्र व्यापार ॥ करिताती नारी अथवा नर ॥ परी हा तंव धर्म व्यापार ॥ विरळा नर आचरे ॥ ६१ ॥
जयाते पुण्य पूर्वीचा संचय ॥ तयाचेंचि उकले ह्रदय ॥ पुण्यमार्गे तोचि जाय ॥ येरा क्षय पुण्यासी ॥ ६२ ॥
जयाते वाटेल मनीं ऐसे ॥ कीं पुण्यमार्गे सौख्य दिसे ॥ तयानें व्रत कीजे सायासे ॥ इतरां नसे तो मार्ग ॥ ६३ ॥
या उभयमार्गी जे मानेल ॥ तेची कीजेहो प्रांजळ ॥ लक्ष्मीप्रति घननीळ ॥ सांगे सकळ विस्तारे ॥ ६४ ॥
स्वस्ति श्रीमलमास माहात्म ग्रंथ ॥ पद्म पुराणींचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ एकादशोध्याय गोड हा ॥ ११ ॥
ओव्या ॥ ६४ ॥ श्लोक ८ ॥
 
॥ इति एकादशोध्यायः ॥

Featured Post

Radha Ashtami Vrat Katha in English

Radha Ashtami Vrat Katha in English Radha Ashtami Vrat Katha 2024: 15 days after the birth of Lord Shri Krishna, the birthday of Goddess Ra...