Adhik Maas Katha Marathi Adhyay 15

अधिकमास माहात्म्य अध्याय पंधरावा

 (Adhik Maas Marathi Adhyay 15, Purushottam Maas Marathi Adhyay 15)

Adhik Maas Katha Adhyay 15 Marathi

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी सद्‍गुरुनाथा ॥ अरूपरूपा गुणातीता ॥ तुमच्या चरणीं माझा माथा ॥ नमन समर्था तुम्हांतें ॥ १ ॥

तव कृपेची नौका थोर ॥ उतरसी जडमूढ पामर ॥ तेथें मी एक अर्भक किंकर ॥ उतरींपा दयाळुवा ॥ २ ॥
भाविक भोळे अज्ञान जन ॥ परपारातें नेशी तयालागून ॥ तरी मी एक अभाविक अज्ञान ॥ ठेवितां दूषण समर्था ॥ ३ ॥
मी तंव नेणें जपतप साधन कांहीं ॥ मतिमंद आळशी सदा सर्वदांही ॥ पीडिलों असें प्रपंचाचे ठायीं ॥ सोडवी आई माउलिये ॥ ४ ॥

व्यर्थ वेंचिले वयसा ॥ केधवां काळ घालील फासा ॥ नाहीं क्षणाचा भरवसा ॥ नसे धीवसा अंतरीं ॥ ५ ॥
संचय नसे धनासीं कांहीं ॥ करावीं दानव्रतें कांहीं ॥ हें तूं जाणसीं सर्वही ॥ ह्रदयगत माझें कृपाळा ॥ ६ ॥


असो आतां हा स्तुतिवाद ॥ परिसा कथानुसंवाद ॥ मगिले अध्यायीं विशद ॥ द्वादशी महिमा वर्णिला ॥ ७ ॥
तोची आतां पुढत पुढती ॥ परिसवूं श्रोतियांप्रती ॥ जेणें आंगीं बाणे विरक्ति ॥ धर्मरीती ठसावे पैं ॥ ८ ॥
जैसा कोणी एक कीर्तनीं जात ॥ तो दुजियातें भावार्थ सांगत ॥ मग तयाचा बैसे हेत ॥ जाय नित्य कीर्तनीं ॥ ९ ॥
तैसीच हेही गोष्ट असे ॥ ऐकतां परम जीव संतोषे ॥ भावार्थे प्रचीत अनयासें ॥ कळों येई आचरलिया ॥ १० ॥
स्मरणात्कीर्तनाद्यत्र प्राप्नोति पदमव्ययं ॥ स्त्रीराजबालघातीच यति विश्वासघातकः ॥ १ ॥
स्त्री बाळ अथवा प्रौढ ॥ किंवा अज्ञान जडमूढ ॥ पापी असलिया द्वाड ॥ ऐकतां सदृढ उद्धरे ॥ ११ ॥
पूर्वी पंच महापापें घडलीं ॥ तीं काय आपणा स्मरती ये वेळीं ॥ काय झालें कवणे काळीं ॥ केवीं नव्हाळी सांगवे ॥ १२ ॥
या लागीं पूर्व पापाचा क्षय व्हावा ॥ म्हणोनि कथाभाग ऐकावा ॥ तदनुसारेंची दानधर्म करावा ॥ सुटका करावी नरदेहाची ॥ १३ ॥
इतर असती जन्मयाती ॥ परी तेथें न घडे धर्मरीती ॥ यालागीं हातोहातीं श्रीपती ॥ यथानिगुती भजावें ॥ १४ ॥
म्हणोनि ऐकिजे सादर ॥ कथालाघव परम अपार ॥ मलमाहात्म अतिसुंदर ॥ लक्ष्मीनारायण संवाद ॥ १५ ॥
सूर्यवंशीं श्रीरामचंद्र ॥ आचरे द्वादशीपर्वथोर ॥ साधवा विधी प्रकार ॥ यथानिगुती संवादी ॥ १६ ॥
अवतार पुरुष तो दाशरथी ॥ सहकुळ निर्दाळिला लंकापती ॥ कुंभकर्णादि बळकीर्ती ॥ निवटिले पराक्रमें ॥ १७ ॥
परी त्या कुंभकर्णाची स्नुषा ॥ कुंभनिकुंभाची योषा ॥ शतमुखी रावणाची पीयूषा ॥ कन्या जाणा प्रीतिपात्र ॥ १८ ॥
तियेतें असे एक सुत ॥ नामे पुढरीक विख्यात ॥ लंकेशाची होतां वाताहत ॥ गेली धांवत पितया पैं ॥ १९ ॥
करूनियां साष्टांग नमन ॥ निवेदिलें सकळ वर्तमान ॥ येरू ऐकता खेदखिन्न ॥ म्हणे मूर्ख रावण केवढा ॥ २० ॥
आम्हां कळूं नेदीतां मात ॥ केला सकळ कुळाचा घात ॥ मी तंव एक क्षणात रघुनाथ ॥ सेनेसहित ग्रासितो ॥ २१ ॥
परी होणार तें न चुके सर्वथा ॥ होऊन गेलें ते जालें आतां ॥ सांप्रत लंकाधीप तत्वता ॥ बिभीषण केला श्रीरामें ॥ २२ ॥
तरी तया बिभीषणाची वार्ता ॥ मी जाऊन पाहीन आतां ॥ दवडूनिया आपुल्या नाता ॥ आपण स्वस्थता राज्य भोगी ॥ २३ ॥
ऐसें बोलोनिया वचन ॥ हांकारिलें सकळ सैन्य ॥ घाव निशाणी घालून ॥ केलें धावणें लंकेवरी ॥ २४ ॥
निशीमाजी एकाएकीं समग्र ॥ येऊन वेढिलें लंकानगर ॥ कळला बिभीषणा समाचार ॥ तोही सत्वर बाहेर निघे ॥ २५ ॥
दोन्ही सैन्या जाला मेळु ॥ घाई उठिला हलकल्लोळु ॥ परी दळे बळें प्रबळु ॥ आहे शतमुखी तो ॥ २६ ॥
बिभीषणातें पराभविले ॥ लंकेबाहेर घातलें ॥ पुंढरीकातें राज्यीं स्थापिलें ॥ गंतव्य केलें माघारी ॥ २७ ॥
इतुकें कृत्य करून देख ॥ परतला तो शतमुख ॥ येरीकडे तो भक्तनायक ॥ विचार करी निजमनीं ॥ २८ ॥
म्हणे आतां कवण उपाय करावा ॥ हानी झाली माझिया गौरवा ॥ केवीं मुख दाखवावें राघवा ॥ अपकीर्ती सर्व जगांत ॥ २९ ॥
परी होणार तें होऊन गेलें ॥ राज्य बुडलियाचें दुःख आगळें ॥ जगामाजी तोंड काळें ॥ जालें सर्वांपरी माझें ॥ ३० ॥
आतां होणार तें सुखें हो कां ॥ शरण जावें श्रीरघुनायका ॥ जेणें दिधली हे लंका ॥ करूनि विवेका निघाला ॥ ३१ ॥
कांहीं सेवक आणि प्रधान ॥ घेऊन निघाला बिभीषण ॥ त्वरें पावला अयोध्या पट्टण ॥ रघुनंदन जेथें असें ॥ ३२ ॥
दंडप्राय लोटांगण ॥ करूनि नमिला रघुनंदन ॥ रामें दिधलें आलिंगन ॥ परम भक्‍त जाणोनी ॥ ३३ ॥
स्वागत पुसोनि परस्परें ॥ सन्निध बैसविला आदरें ॥ मुखारविंद पाहतां रघुवीरें ॥ तंव वदनेंदु कोमाइला ॥ ३४ ॥
म्हणे बिभीषणा प्राणसखया ॥ शोकाकुलीत दिसे ह्रदया ॥ तरी निवेदीं महत्कार्या ॥ जें हरविधातिया अलोट ॥ ३५ ॥
ऐसें रघुपतीचें वचन ॥ ऐकोनि बोलें बिभीषण ॥ मग स्तुतिवादें रघुनंदन ॥ पूजिता जाला आदरेंसी ॥ ३६ ॥
जयजयाजी रघुनंदना ॥ कृपासागरा पतितपावना ॥ भक्‍तरक्षका दीनोद्धारणा ॥ कृपानिधाना रघुपती ॥ ३७ ॥
भक्‍तकैवारी रघुराया ॥ तव दर्शनें हरें सकळ माया ॥ नाम स्मरणें पापक्षया ॥ जाय विलया रघुपती ॥ ३८ ॥
तूं तव एकवचनीं एक बाण ॥ हा तव तुझा नेम रघुनंदन ॥ ऐसें असतां असत्यपण ॥ आलें दिसोन ये काळीं ॥ ३९ ॥
तरी तुवा निज कृपेंकरून ॥ लंकाराज्य दिधलें दान ॥ तेथें झालें महाविघ्न ॥ ऐकें कथन रघुराया ॥ ४० ॥
शतमुखीं रावण पाहीं ॥ तो तंव आमुचा असें व्याही ॥ तयाची कन्या स्नुषा होई ॥ भार्या पाहीं निकुंभाची ॥ ४१ ॥
तियेतें असे पुत्र एक ॥ नाम तयाचें पुंडरीक तयातें घेऊनियां देख ॥ स्नुषा गेली पितयां पैं ॥ ४२ ॥
लंकेचें आद्यंत वर्तमान ॥ तियेनें पितयातें केलें श्रवण ॥ मग तो सकळ सैन्य घेऊन ॥ आला चालून लंकेसी ॥ ४३ ॥
मातें समरीं पराभवून ॥ लंका राज्य घेतलें हिरून ॥ पुंडरीकातें राज्यीं स्थापून ॥ गेला निघोन मागुता ॥ ४४ ॥
म्हणोनिया रघुनंदना ॥ शरण आलों तंव चरणा ॥ सांगोनिया वर्तमाना ॥ निवांत स्थाना बैसला ॥ ४५ ॥
ऐकून बिभीषणाचें उत्तर ॥ निवांत बैसला रघुवीर ॥ आरक्त करूनि नेत्रे ॥ काय बोले ते समयीं ॥ ४६ ॥
म्हणे माझिया भक्‍तालागून ॥ कोण छळिता दुर्जन ॥ तयातें समूळीं निर्दाळीन ॥ मी रघुनंदन स्वयें कर्ता ॥ ४७ ॥
मी भक्‍तालागीं अवतार ॥ युगायुगीं घेतले साचार ॥ ऐसा कोण असे पामर ॥ दे तिरस्कार माझिया भक्‍ता ॥ ४८ ॥
तरी ऐक माझिया वचनासी ॥ आजी असे एकादशी ॥ मारूनिया शतमुखासी ॥ राज्यीं तुजसी स्थापीन ॥ ४९ ॥
इतुकें करूनियां कारण ॥ द्वादशीचें अयोध्येशी पारण ॥ करीन साधनीं व्रतपूर्ण ॥ तरीच रघुनंदन नाम माझें ॥ ५० ॥
ऐसें प्रतिज्ञा वचन ॥ श्रीरामाचें ऐकून जाण ॥ बोलता जाला बिभीषण ॥ अघटित वचन केवी घडे ॥ ५१ ॥
दधी समुद्राचे मध्य बेटीं ॥ तया असुराचें स्थान जगजेठी ॥ आदौ ऐकिजे ते गोष्टी ॥ सविस्तर सांगेन ॥ ५२ ॥
येथून पांच कोटी योजने दूर ॥ असे तो दधि सागर ॥ तेथील मध्य बेटाचा विस्तार ॥ लक्ष योजनें लांबी रुंदी ॥ ५३ ॥
तेथें वास्तव्य असुरातें ॥ संख्या नसेची सैन्यातें ॥ निवटून तया दुष्टातें ॥ केवी अयोध्ये घडे द्वादशी ॥ ५४ ॥
ऐसें मनोमानसाचें वाक्यें ॥ आकर्णोनि अयोध्यानायकें ॥ स्तब्ध घटिका मुहूर्त एक ॥ न सुचे आणीक उपावो ॥ ५५ ॥
म्हणे हें तो अलोट कार्य दिसे ॥ आमचें नेमोत्तर घडे कैसे ॥ भक्‍त मनोरथ पुरतां न दिसे ॥ रविवंशीं दिसे दूषण ॥ ५६ ॥
मी तव भक्तकामकल्पद्रुम ॥ हें मिथ्यत्व दिसे परम ॥ भक्तमनोभिराम हें नाम ॥ साच न दिसे आमुतें ॥ ५७ ॥
राजाधिराज रघुनायक ॥ तो संकटीं पडला देख ॥ मग इतरांचा केउता लेख ॥ संकटार्थ विचारा ॥ ५८ ॥
परी भक्‍तालागीं संकटीं ॥ पडला असे रवीकिरिटी ॥ इतर जनाची राहटी ॥ होती कष्टी प्रपंचीं ॥ ५९ ॥
प्रपंचीं कष्टी होतां फार ॥ मग आठविती परमेश्वर ॥ तेवीं संकटीं पडतां रघुवीर ॥ स्मरे कुमरवायूचा ॥ ६० ॥
देव भक्‍तपण वेगळें न दिसे ॥ ते तंव एकमय वर्तती ऐसें ॥ जेवी परिमळ पुष्पीं वसे ॥ तैसे देव भक्त एकरूप ॥ ६१ ॥
त्याहीवरी सांब आणि रघुनाथ ॥ वेगळेपण नाहीं उभयतांत ॥ तोचि अंश वायुसुत ॥ साक्षात अवतार शिवाचा ॥ ६२ ॥
म्हणोनि स्मरतां रघुनाथ ॥ तात्काळ उभा ठेला हनुमंत ॥ जोडूनियां दोन्ही हस्त ॥ विनवीत रघुराया ॥ ६३ ॥
म्हणे केउता संकटार्णव अपार ॥ मी तव सन्निध असतां वीर ॥ पडतीया आकाशा देऊं धीर ॥ तेथें तो असुर कायसा ॥ ६४ ॥
ऐसा उभयतांचा संवाद ॥ होतां तेथें प्रगटला नारद ॥ अर्पूनि पूजा प्रकार सद्य ॥ निजासनीं बैसविला ॥ ६५ ॥
मग नारद म्हणेजी रघुराया ॥ केवि खिन्न दिसती हे चर्या ॥ अवघा वृत्तांत रघुराया ॥ निवेदित ऋषीतें ॥ ६६ ॥
नारद म्हणे जी श्रीरामा ॥ अचाट वदलेती नेमा ॥ तो दैत्य नावरे जी तुम्हां ॥ दुर्धर संग्रामा ये काळीं ॥ ६७ ॥
परी मारुती ऐसा वीर जेठी ॥ हा तव साह्य राखील पाठी ॥ तरी सैन्य करा सिद्ध उठाउठी ॥ घ्यावी भेटी दैत्याची ॥ ६८ ॥
परी पंचाशत कोटी दूर ॥ ऐसें तया दैत्याचें नगर ॥ केवी साह्य हा तव प्रकार ॥ न कळे निर्धार राघवा ॥ ६९ ॥
ऐसें ऐकतां मुनिवचन ॥ आवेशला वायुनंदन ॥ सकळ सैन्य सिद्ध करून ॥ रघुनंदन उभा ठेला ॥ ७० ॥
मग काय करी अंजनीसुत ॥ रूप धरिले अति अद्‍भुत ॥ आकाशीं मुख पाद पाताळांत ॥ देखता रघुनाथ हर्षला ॥ ७१ ॥
मग पिंजारून रोमावळी ॥ वरी बैसविली सैन्य मंडळी ॥ राम लक्ष्मण स्कंध मौळीं ॥ कक्षेतळीं बिभीषण ॥ ७२ ॥
तंव नारद म्हणे जी स्वामी ॥ समागमें येतसों आम्हीं ॥ पाहू संग्रामाची उर्मी ॥ दैत्यधाम अवलोकूं ॥ ७३ ॥
अवश्य म्हणे जानकीवर ॥ तंव काय करी वायुकुमर ॥ दक्षण चरण उचलून सत्वर ॥ दैत्य नगर आक्रमिलें ॥ ७४ ॥
एक चरण अयोध्ये आंत ॥ दुजा ठेविला दैत्य नगरांत ॥ मग बोलें वायुसुत ॥ उतरा त्वरित पैं आतां ॥ ७५ ॥
शतमुखाची हेची नगरी ॥ वेढा घाला जी सत्वरी ॥ देखूनियां आश्चर्य करि ॥ मुनीसहीत राघव ॥ ७६ ॥
म्हणे निमिष्य न लोटतां जाण ॥ अठरा पद्में वानर सैन्य ॥ त्याहीवरी अयोध्येचे वीरगण ॥ संस्था जाण नसेची ॥ ७७ ॥
इतुकिया सहीत सत्वरी ॥ घेऊन आला कपीकेसरी ॥ म्हणूनि हर्ष न माय अंबरीं ॥ वेढिली नगरी दैत्याची ॥ ७८ ॥
सर्वत्रांचा एकचि कल्होळ ॥ ऐकूनियां दैत्यपाळ ॥ समाचार आणवीत सकळ ॥ कळलें ते वेळीं तयातें ॥ ७९ ॥
बिभीषणाच्या कैवारें ॥ धांवणें केलेंसे रघुवीरें ॥ म्हणूनियां आवेशें थोरें ॥ निघे बाहेर स्वसैन्येसीं ॥ ८० ॥
अचाट बळी दैत्य राणा ॥ वर्षता जाला अभितबाणा ॥ घाई जर्जर केली सकळसेना ॥ रघुनंदन देख तसे ॥ ८१ ॥
मग मारुतीस्कंदी रघुवीर ॥ वर्षत झाला बाणाचा पूर ॥ परी नाटोपे तो दैत्येश्वर ॥ वर्षे अपार बाणातें ॥ ८२ ॥
ऐसें युद्ध होता ते वेळीं ॥ तीन प्रहर रात्र होऊं आली ॥ श्रीरामें चिंताअनळीं ॥ वस्ती केली तेधवां ॥ ८३ ॥
म्हणें या दैत्यातें पराभवून ॥ बिभीषणातें राज्य देऊन ॥ न घडे अयोध्येसी गमन ॥ द्वादशी पूर्ण न घडे ते ॥ ८४ ॥
ऐशा विचारें मनांत ॥ तटस्थ ठेला रघुनाथ ॥ हें देखोनि नारद हसत ॥ केवी हे मात घडू शके ॥ ८५ ॥
तरी परिसीजे चापपाणी ॥ हा दैत्य शिववरदायिनी ॥ कदां नाटोपे तुम्हांलागुनी ॥ वृथा कहाणी मनाची ॥ ८६ ॥
तरी या विषयीचा उपाय एक असें ॥ मायाधीन हें जगत वसे ॥ तुम्ही तो सगुणत्व मायावेषें ॥ अकार आपैसें जालेती ॥ ८७ ॥
तरी ते माया आलियाविन ॥ हा दैत्य नाटोपें कवणालागून ॥ यालागीं जानकीते प्रार्थून ॥ आणी रघुनंदन कंदनानें ॥ ८८ ॥
मागुती पाहे रामराणा ॥ ऐकून मुनीच्या वचना ॥ तंव तो पुढें अंजनीसूता ॥ काय रघुनंदन बोलत ॥ ८९ ॥
म्हणे सखया संकटकाळीं ॥ आतां संभाळावें ये वेळीं ॥ सीतेतें आणून संकट टाळीं ॥ करी नव्हाळी इतुकीहे ॥ ९० ॥
ऐकून स्वामी वचनार्था ॥ थोर आवेश आला हनुमंता ॥ म्हणे चिंता न करीजे रघुनाथा ॥ जानकी आतां आणितों ॥ ९१ ॥
मग पुढील चरण मागे केला ॥ तो अयोध्येमाजी उभा ठेला ॥ अंतर मंदिरी प्रवेशला ॥ तंव देखतां झाला अपूर्व ॥ ९२ ॥
भूमीशायी जनकबाळा ॥ भोगी निद्रेचा सोहळा ॥ मारुती विचारी ते वेळां ॥ निद्रा भंगिता झगटे दोष ॥ ९३ ॥
मग पुच्छें गुंडाळून मंदीर ॥ उपटून घेतलें समग्र ॥ मागुता दक्षण चरण आवग्र ॥ रणभूमीं ठेविलासे ॥ ९४ ॥
क्षण न लागतां पैं तेथें ॥ न लवतां डोळियाचें पातें ॥ घेऊन आला जानकीते ॥ मंदिरासहित रणभूमी ॥ ९५ ॥
मग म्हणजे रघुराया ॥ नमन माझें तुझीया पायां ॥ घेऊन आलों जनकतनया ॥ आदिमाया प्रणवरूपी ॥ ९६ ॥
ऐकून तयाचें उत्तर ॥ परमहर्षयुक्त रघुवीर ॥ मागें पाहे तंव समग्र मंदीर ॥ सीताचिद्रत्‍न भूमीशायी ॥ ९७ ॥
परम आश्चर्यातें पाहून ॥ म्हणे धन्य माऊली अंजनी निधान ॥ जी प्रसवली ऐसें रत्‍न ॥ बळिया निधान मारुती ॥ ९८ ॥
मग अंतर्गृहीं प्रवेशून ॥ खुणें जागृत करी सीतेलागून ॥ येरी उठली दचकून ॥ तंव रघुनंदन देखिला ॥ ९९ ॥
मनीं दचकली जनकबाळी ॥ म्हणे मी काय स्वप्न देखिलें येवेळीं ॥ श्रीराम गेले युद्धमेळीं ॥ हे तो नव्हाळी अनुपम्य ॥ १०० ॥
जाणूनि सीतेचें ह्रद्गत ॥ बोलत जाला रघुनाथ ॥ म्हणे स्वप्न नव्हे हे सत्यमात ॥ होईं जागृत शुभानने ॥ १ ॥
आम्हातें दैत्य नाटोपे युद्धीं ॥ म्हणोनि आणिलेंयें संधी ॥ आतां न लावीं अवधी ॥ त्वरें वधीं दैत्य अधमा ॥ २ ॥
निशी उरली किंचित ॥ पुढें जाणें आहे अयोध्येत ॥ दादशी साधन असे तेथ ॥ त्वरित उठें ये काळीं ॥ ३ ॥
ऐसें ऐकतां वचनार्था ॥ चरणावरी ठेवीला माथा ॥ म्हणे द्याजी बाण भाता ॥ धनुष्यलता समवेत ॥ ४ ॥
थोर आवेशें ते काळीं ॥ बाणभाता पृष्ठमौळीं ॥ धनुष्य घेऊन करकमळीं ॥ दिधली आरोळी अटाहास्यें ॥ ५ ॥
ते साक्षात आदिशक्ति ॥ हांकें त्रिभुवन आंदोलती ॥ दैत्य परम दचकला चित्तीं ॥ म्हणे हे चिच्छक्ति प्रगटली ॥ ६ ॥
परी धैर्य मेंढा वाहन ॥ दैत्य आला चालून ॥ वर्षताजाला अमितबाण ॥ जेणें त्रिभुवन कोंदलें ॥ ७ ॥
मग म्हणेजी श्रीरामा ॥ अगाध तुझा महिमा ॥ स्त्रिये लाविलें संग्रामा ॥ अगाध महिमा देखिला ॥ ८ ॥
मी तंव दुर्धर वीर पाहें ॥ स्त्रियेतें संग्राम केवीं लाहे ॥ स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे ॥ कवण लाहे पुरुषार्था ॥ ९ ॥
परी मी भीत नाहीं मरणातें ॥ अंतकाळीं देखिलें रघोत्तमातें ॥ तेणें सुखावलों अंतरातें ॥ पुढें होणार तें सुखें हो कां ॥ १० ॥
कालची असे हरिदिनी ॥ आतां उदेली द्वादशी साधनी ॥ ऐसें बोलून तेक्षणीं ॥ अमित बाणी वर्षत ॥ ११ ॥
येरीकडे त्रिभुवनजननी ॥ धनुष्यातें बाण लावुनी ॥ विंधिती झाली तत्क्षणीं ॥ निर्वाण बाणें विंधित ॥ १२ ॥
पातें लवतां अर्धघटी ॥ बाण मारिले लक्षकोटी ॥ परी तो दैत्येंद्र महाहट्टी ॥ तितुकेही निवटी बाणजाळ ॥ १३ ॥
हें देखून जनकतनया ॥ विचारून बाण घेतला लवलाह्या ॥ झांपडी पडली दैत्य डोळियां ॥ येऊन ह्रदया आदळत ॥ १४ ॥
एकाचि बाणें केला पूर्ण ॥ कांहीं न सुचे तया लागून ॥ जेवीं वृक्ष पडे उन्मळोन ॥ तेवी असुर पडियेला ॥ १५ ॥
धूड पडतांची मदिनी ॥ वितुळली असुरवाहिनी ॥ जयजयकाराची उठली ध्वनी ॥ वानरसेने आनंद ॥ १६ ॥
सेना विखुरली चहूंकडे ॥ नगर लुटविलें निवाटें ॥ बिभीषण हर्ष कोडें ॥ रामाकडे पाहत ॥ १७ ॥
यापरि निवटूनि असूर ॥ निशी उरली घटका चार ॥ मग युद्ध करूनियां स्थिर ॥ स्तवी रघुवीर जानकीतें ॥ १८ ॥
मागुती हनुमंतातें बोलत ॥ सखया बिभीषणा राज्यीं स्थापीं त्वरिंत ॥ अवश्य म्हणोनि वायुसुत ॥ पुच्छाग्रीं बैसवीत सैन्यातें ॥ १९ ॥
दक्षिण चरण उचलूनियां ॥ लंकेमाजी ठेविला लवलाह्या ॥ मग म्हणेजे रघुराया ॥ उतरावें या लंकेसीं ॥ २० ॥
राज्य द्यावें बिभीषणातें ॥ अयोध्यें चलावें त्वरित ॥ ऐसी ऐकतांची मात ॥ थोर हरुष रामचंद्रा ॥ २१ ॥
मग लंकेमाजी वाद्यघोष ॥ होता झाला परम उल्हास ॥ राज्यीं स्थापून बिभीषणास ॥ अयोध्याधीश आज्ञा मागे ॥ २२ ॥
मग बिभीषणें दंडप्राय नमस्कार ॥ करूनि स्तविला रघुवीर ॥ म्हणे भक्तपालना ब्रीद थोर ॥ केलें साचार स्वामीयां ॥ २३ ॥
तरीं साधन द्वादशी ॥ जाली पाहिजे लंकेसी ॥ सहपरिवारें स्वसैन्यासी ॥ विधियुक्त पै कीजे ॥ २४ ॥
मग बोले श्रीरघुवीर ॥ हातो येथें न घडे विचार ॥ वाट पाहत असे भरतवीर ॥ तयावीण प्रकार न घडे हा ॥ २५ ॥
धन्य तयाचें बंधुपण ॥ उभयतां ऐक्यत्व पूर्ण ॥ नाहीं तरी सापत्‍न जाण ॥ घेती प्राण एकमेकांचे ॥ २६ ॥
तैसा नव्हे श्रीरघुवीर ॥ भक्‍तपाळण समरंगधीर ॥ शांत करूनि लंकेश्वर ॥ निघे सत्वर तेथुनी ॥ २७ ॥
मागुता हनुमतातें ॥ स्तवूनि म्हणें तयातें ॥ सखया नेई त्वरें अयोध्येतें ॥ परिवारा तें काळीं ॥ २८ ॥
ऐकतां रघुवीर-वचन ॥ आवेषला वायुनंदन ॥ मागुता उचलून चरण ॥ अयोध्येमाजी ठेविला ॥ २९ ॥
परिवारासहीत ते वेळीं ॥ सकळसेना उतरली खालीं ॥ सकळ वाहिनी आनंदली ॥ जयजयकारें गर्जती ॥ ३० ॥
तों पूर्वीच पाकसिद्ध होत ॥ स्नानें सारूनियां समस्त ॥ तंव अरुणोदय होतां प्राप्त ॥ पात्रें विस्तारीत समग्र ॥ ३१ ॥
समस्तांसहीत सारूनि भोजनें ॥ द्वादशी साधिली रघुनंदनें ॥ ऐसें द्वादशीचें महिमान ॥ केलें कथन श्रोतियांतें ॥ ३२ ॥
म्हणोनी तिथीमाजी उत्तम ॥ द्वादशी पर्व उत्तमोत्तम ॥ व्रत करिता हें निःसीम ॥ विजयी संग्राम तो पावे ॥ ३३ ॥
आणि प्राप्त होय राजलक्ष्मी ॥ अंतीं पावे मोक्षधामीं ॥ हें अनुपम्य व्रतनेमीं ॥ प्रचीत नामीं असों द्या ॥ ३४ ॥
पदच्युत बिभीषण ॥ तो पावला राज्यासन॥ ऐसें व्रताचें महिमान ॥ व्रत संपूर्ण द्वादशी ॥ ३५ ॥
व्रत करितां शतमुखासी ॥ रामबाणें मुक्ती तयासी ॥ अंती गेला सायुज्यतेसी ॥ पुनरावृतीसी नागवे ॥ ३६ ॥
व्रत करितां रघुनंदन ॥ रणीं विजयी झाला पूर्ण ॥ मर्दूनियां शतमुखी रावण ॥ व्रत संपूर्ण साधिलें ॥ ३७ ॥
म्हणोनियां श्रोतें सज्जन ॥ हें व्रत करावें जाण ॥ जें आचरतां यशकल्याण ॥ मोक्षभुवन प्राप्त होय ॥ ३८ ॥
हे कथा गोड ऐकिली ॥ म्हणोनियां दृष्टांतीं योजिली ॥ श्रोतीं श्रवण कीजे सकळीं ॥ बद्धांजली प्रार्धितों ॥ ३९ ॥
कोणेही प्रकारें करून ॥ करावे भगवंत गुणवर्णन ॥ काळ सार्थक तेणें करून ॥ येत घडून आपैसा ॥ ४० ॥
मग केलें कर्म वायां जाय ॥ हें तो न घडे कालत्रय ॥ म्हणोनियां अति लवलाह्य ॥ वर्णावे गुण हरीचे ॥ ४१ ॥
ऐसें हें द्वादशी महिमान ॥ केलें अवघें कथन ॥ येथून पांच वर्षे संपूर्ण ॥ झाली पुढें अवधान असों द्या ॥ ४२ ॥
किंबहूक्‍ते न देवेशि न तिथि द्वार्दशसिमा ॥ यस्य मासस्ययो देवो द्वादश्यांतं प्रपूजयेत् ॥ २ ॥
दु:ख द्रारिद्र्य रोगाणामास्पदंसोभि जायते ॥ न द्वारका नोज्जयिनी न काशी-मथुरापिच ॥ ३ ॥
हें व्रत जे करिती नेमेसी ॥ दुःख दारिद्र नव्हे त्यासी ॥ नको तीर्था यात्रेसी ॥ काशी उज्जनी द्वारके ॥ १४३ ॥
स्वस्ति श्रीअधिक माहात्म्य ग्रंथ ॥ नाटकाधार पद्मपुराणे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ पंचदशोऽध्याय गोड हा
॥ १५ ॥ ओव्या ॥ १४३ ॥ श्लोक ३ ॥
 
॥ इति पंचदशोऽध्यायः ॥

Featured Post

Anant Chaturdashi 2024

Anant Chaturdashi 2024   Anant Chaturdashi  is a day to worship God Vishnu in his eternal form, that is the form which is Anant or "...