Adhik Maas Katha Marathi Adhyay 27

अधिकमास माहात्म्य अध्याय सत्ताविसावा

 (Adhik Maas Marathi Adhyay 27, Purushottam Maas Marathi Adhyay 27)

Adhik Maas Katha Adhyay 27 Marathi

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरूभ्यो नमः ॥ जयजयमाते आदिजननी ॥ त्रिपुरसुंदरी त्रैलोक्यपावनी ॥ सर्वदुःखदरिद्रशमनी ॥ विघ्नहरणी महामाये ॥ १ ॥

तुझिया कृपाकटाक्षें जाण ॥ पांगुळ पवनाहूनी करी गमन ॥ मुका तोची वाचाळ होय जाण ॥ कृपेकरून तुझिया ॥ ॥

ऐका श्रोते एकाग्रचित्त ॥ मलमहिमा अति अद्‍भूत ॥ लक्ष्मीतें नारायण सांगत ॥ तोचि संकलितार्थ निवेदूं ॥ ३ ॥

श्रीउवाच ॥ समानफलदादेव सर्वेमस्मलिम्लुचाः ॥ विशेषोत्तर कथं कस्य तदेतद् वदमे प्रभो ॥ १ ॥

लक्ष्मी वदे हो देवादिदेवा ॥ कृपासागरा करुणार्णवा ॥ समान फल व्रत प्रभावा ॥ कैसे निदेवा लाहिजे ॥ ४ ॥

विषद कीजे जी पुरुषोत्तमा ॥ तेणें आचरतां कर्माकर्मा प्राणी पवती मोक्षधामा ॥ होय अधमा उपरती ॥ ५ ॥

ऐसा शब्द रमेचा ऐकून ॥ बोलता जाला नारायण ॥ तोची श्लोकाधार पूर्ण ॥ करा श्रवणहो ॥ ६ ॥

नारायण उवाच ॥ समानफलदा देवीसर्वेमासाधिमासका: ॥ विशेषफलदाह्येते माघवैशाखकार्तिकाः ॥ २ ॥

ऐका सुंदरीये पाहीं ॥ समान फळ सर्वही ॥ परी उत्तमोत्तमही ॥ प्रकार वेगळा पै ॥ ७ ॥

विशेष महिमा जाण ॥ पूर्णिमा म्हणजे तीन ॥ माघी वैशाखी कार्तिकी जाण ॥ विशेषहून मलमासीं ॥ ८ ॥

येथें कीजे स्नानदानविधी ॥ विप्रभोजन यथाविधी ॥ होमहवन जपसिद्धि ॥ तरी सर्वसिद्धि तो पावे ॥ ९ ॥

भावे करावे विप्रपूजन ॥ मग यथाशक्त्या दीजे दान ॥ त्रयत्रीणि दशक अपूप अन्न ॥ घृतासहित अर्पावें ॥ १० ॥

याहीवरी जें दान निवेदिले ॥ ते तें पाहिजे प्रत्यही केलें ॥ ऐसें जरी न घडे एक वेळे ॥ पाहिजे केलें पूर्णिमेसी ॥ ११ ॥

मग संपूर्ण मास संपादित व्रत ॥ उद्यापन कीजे यथास्थित ॥ तै संपूर्ण फल होय प्राप्त ॥ जाण सत्य वरानने ॥ १२ ॥

संपूर्ण फलसमानता ॥ प्राप्त होय कैसेनि आतां ॥ तरीं यदर्थी ऐकें तत्वतां ॥ इतिहास शुभानने ॥ १३ ॥

पूर्वी कृत युगाच्या ठायीं ॥ अपूर्व जालीं एक नवाई ॥ तेची श्रवण करवूं ये समयीं ॥ तुज पायीं वरानने ॥ १४ ॥

सुशर्मानामें नृपवर ॥ असे भूपती राज्यधर ॥ धर्मपारंगत अतितत्पर ॥ दानशूर प्रतापि ॥ १५ ॥

सर्वधर्मीं पारंगत पाहीं ॥ हरिभजनीं झिजे देहीं ॥ कथापुराणें कालकर्मीं सर्वही ॥ नीतिन्यायें चालवी राजधर्म ॥ १६ ॥

सत्पात्रीं विन्मुख नव्हे कदां ॥ कधींही न प्रवर्ते वादविवादा ॥ हरिस्मरणीं रत सदा ॥ विप्रसेवा आदरेसी ॥ १७ ॥

भार्या तयाची सुंदर पतिव्रता ॥ सुष्टमती नामें तत्वता ॥ परम प्रीति उभयतां ॥ सदां सादरता पतिसेवे ॥ १८ ॥

तंव पातला मलमास ॥ उभयतां आचरती व्रतास ॥ विप्रभोजनीं अतिहव्यास ॥ दिवसेंदिवस वृद्धिंगत ॥ १९ ॥

दानधर्म नित्य करिती ॥ उणें न पावे कवणे रिती ॥ प्रातःस्नाने उभयता सारिती ॥ आणि मौन्यें सारिती नक्तातें ॥ २० ॥

ऐसें व्रत शास्त्राधारें ॥ आचरती उभयतां वधुवरे ॥ तंव अंगिराऋषी तपी थोरे ॥ राजदर्शना पातला ॥ २१ ॥

दृष्टीं देखतां तपोराशी ॥ उल्हास परम नृपासी ॥ देऊनिया निज आसनासी ॥ भूतळवटासी बैसे राव ॥ २२ ॥

मग आणूनि पूजा प्रकार ॥ उभयतां पूजिते जाले मुनेश्वर ॥ परम हर्षे निर्भर नृपवर ॥ करी सोपस्कार पूजेचा ॥ २३ ॥

ऐसी पूजा करितां तेच क्षणीं ॥ वस्त्रे अलंकारें अर्चिला मुनी ॥ परमहर्षयुक्त अंगिरामुनि ॥ आतिथ्य पाहुनी नृपाचें ॥ २४ ॥

मग बोलता जाला मुनि ॥ भावा आगळा देखिला भूपती ॥ व्रत आचरतां उभयतीं ॥ जाला मातें आनंदु ॥ २५ ॥

उत्तमासनीं बैसविलें आम्हां ॥ भूमीशाई तूं नृपोत्तमा ॥ तुज ऐसा धार्मिक महात्मा ॥ न देखिला अद्यापि ॥ २६ ॥

विप्रातें दिधले अग्रहार ॥ वापीकूप सरोवरें अपार ॥ कीर्ति तुझी नृपवरा थोर ॥ भूधरा आगळी ॥ २७ ॥

ऐसी स्तुतिवादें मुनीची ॥ प्रशंसा ऐकता नृपाची ॥ उद्विग्नता नाही गेली मनाची ॥ बोले काही नृपवर ॥ २८ ॥

तव दर्शनें धन्य जालों आजी ॥ सकळ तीर्थे तव चरणसरोजीं ॥ भाग्यातें पार नाहीं आजी ॥ कृतकृत्य सहजी मज केले ॥ २९ ॥

द्विजसेवे ऐसें नाही देख ॥ साधन दुजें नाहीं आणीक ॥ सदां सेवावें चरणोदक ॥ पावन होती सर्वही ॥ ३० ॥

तुमचिया आशीर्वादे करून ॥ सकळ संपत्ती लाधली पूर्ण ॥ ऐसें तुमचें महिमान ॥ केले पावन मजलागीं ॥ ३१ ॥

न पाचारितां आलेति ॥ अवलोकिली सकळसंपत्ति ॥ पुत्रकलत्रादी युवती ॥ मानीं तृप्ति मी सर्व तेणें ॥ ३२ ॥

ऐसा स्तुतिवाद एकमेकांतें ॥ वाक्‍पुष्पें संतोषविती तेथें ॥ तवं बोलतां जाला नृपनाथ ॥ मुनिवरातें ते काळी ॥ ३३ ॥

म्हणे स्वामिया ऐकावें ॥ जे आश्चर्ये देखिलें स्वभावें ॥ तेंची कथितों सुशोभनाभावें ॥ तथास्तु या भावें बोलें मुनी ॥ ३४ ॥

आम्ही उभयता आचरूं व्रतास ॥ मलमाहात्म्य हें निर्दोष ॥ अपूर्व एक देखिलें असे ॥ तेची परियेसीं मुनिराया ॥ ३५ ॥

अधिमासेपुरा वैश्यो नाम्ना वीर इति श्रुतः ॥ कुमार्गनिरतोनित्यं सर्वलोकहितेरतः ॥ ३ ॥

माझिया नगरामाजी एक ॥ वैश्य नांदतसे देख ॥ वीर ऐसें तयाचें नामांक ॥ परम हिंसक चांडाळ तो ॥ ३६ ॥

चौरकर्म करूनि जाण ॥ पश्‍वादी आणि गोधन ॥ तयाचा विक्रय करून तेणें ॥ धनही हरित विप्राचें ॥ ३७ ॥

जीवमात्रांचा वध करी ॥ प्राणियातें जीवें मारी ॥ वेश्यारत अहोरात्रीं ॥ ऐसा दुराचारी कृतघ्न ॥ ३८ ॥

निष्ठुर भाषणी अनृत वचनी ॥ पापाचे भय न धरी मनी ॥ ऎसा तो वर्तत असतां जनीं ॥ जाली परी ते ऐका ॥ ३९ ॥

ऐसा तो परम कृतघ्न ॥ स्त्रीसहित सेविलें अरण्य ॥ सकुटुंबेसी हिंसाधर्म आचरून ॥ उदरपोषण चालविती ॥ ४० ॥

सदां मार्ग रोधूनि जाण ॥ हरितसे पांथस्थाचें धन ॥ वस्त्रें आणीक प्रावर्ण ॥ हरून नग्न सोडितसे ॥ ४१ ॥

ऐसें असतां एके अवसरीं ॥ तृषाक्रांत वीर अंतरी ॥ उदक धुंडिता हिंसाकरी ॥ तंव देखिलें नेत्री अपूर्व ॥ ४२ ॥

एक देवालय अतिजीर्ण ॥ श्रीविष्णुदैवत असे जाण ॥ देखतां जाला दुरून ॥ हर्षयुक्त निज मनीं ॥ ४३ ॥

सभोंवते वृक्ष घनदाट ॥ केळीनारळी आचट ॥ आंब्र निंबोनि आणि कवठ ॥ देखता थाट मन भुले ॥ ४४ ॥

नाना पुष्पांचिया जाती ॥ तेथें बिल्वादि वृक्ष शोभती ॥ जाई जुई आणि मालती ॥ केतकी डोलती फुलभारें ॥ ४५ ॥

येथें चातकें मयोरे बदक ॥ चक्रवाकादी कोकिळांक ॥ नाना जातीचे पक्षी अनेक ॥ विचरती देखते ठायीं ॥ ४६ ॥

ऐसे अपूर्व रम्य स्थान ॥ सरोवरीं उदक अमृतसमान ॥ वीरेश्वरें नयनीं देखून ॥ गेला धांवून सरोवरतीरा ॥ ४७ ॥

कांतेसहीत जलपान करूनी ॥ क्षण एक विश्रांती पावला ते स्थानीं ॥ तो तेथें आमुची राजपत्‍नी ॥ दर्शना लागुनि गेलीसे ॥ ४८ ॥

करूनियां देवदर्शन ॥ नयनीं सभोवतें निरखितसे वन ॥ तंव तेथें स्त्रीपुरुष दोघेजण ॥ बैसले श्रमोन एकांती ॥ ४९ ॥

तंव ते वीरबाहूची भार्या ॥ येऊन लागतसे पायां ॥ स्वदुःखवार्ता निवेदुनियां ॥ रुदित शब्दें करूनी ॥ ५० ॥

म्हणे बाई जन्मवरी ॥ भ्रताराचें सौख्य नाही तिळभरी ॥ हा तंव कृतघ्न दुराचारी ॥ परम हत्यारी निर्दय ॥ ५१ ॥

याचिया संगती करून ॥ नेणें कांहीं पुण्याचरण ॥ दान तप न घडे जाण ॥ पापाचेन सर्वदां ॥ ५२ ॥

नेणों जन्मपंक्ती अनंत ॥ नेणों सार्थक न घडे देहान्त ॥ पुढें यमयातना बहुत ॥ न दिसे प्रांत मज कांहीं ॥ ५३ ॥

ऐसी नाना परी करुणा ॥ भाकिती जाली वीर अंगना ॥ कृपेनें द्रवली ते शुभानना ॥ राजांगना ते वेळीं ॥ ५४ ॥

मग उठोनियां लवलाहीं ॥ नृपाचरणीं ठेविली डोई ॥ म्हणे महाराजा विनंती परिसावी ॥ ही उभयतां अतिदुःखी ॥ ५५ ॥

तरी यातें कवण उपावो ॥ स्वामी कृपा करूनि निवेदाहो ॥ अतिउत्तम नरदेह पाहाहो ॥ केवी गती पुढारी पैं ॥ ५६ ॥

पूर्वकर्माद्‍भुत हे दोघे ॥ हिंसाधर्म आचरती आंगें ॥ पुण्यसंस्कार आंगीं न लागे ॥ तरीं तरती वेगें कैसेनी ॥ ५७ ॥

यातें पाहूनि ह्रदयीं ॥ दया उपजली माझे जीवीं ॥ तरीं कृपाकरूनीं उपदेशावी ॥ पावे पदवी सायुज्यता ॥ ५८ ॥

ऐकून उभयतांचे वचन ॥ मग मी उभयतांते आश्वासन ॥ फळें भक्षविलीं तया लागून ॥ उपाय जाण सांगितला ॥ ५९ ॥

सहज रीती बोलिलों त्यातें ॥ प्राप्त जाल्या मलमासातें ॥ तरीं सांगतो जें तुम्हांतें ॥ धरा मानसीं निर्धारें ॥ ६० ॥

अंतकालेच संप्राप्ते यन्नामविवशोगृणेन ॥ प्रयाति विष्णुसालोक्यं ॥ पूर्व पुण्यप्रभावतः ॥ ४ ॥

अंतकाळीं जयातें घडे विष्णु स्मरण ॥ तयानें अन्य सेवा न लगे करणें ॥ पापी हो कां सज्ञान-अज्ञान ॥ जाय उद्धरून तात्काळी ॥ ६१ ॥

तरीं तुम्हीं उभयतां स्त्री-पुरुष ॥ मनीं धरूनीं हव्यास ॥ नित्यानित्य विशेषाविशेष ॥ नामघोष पैं करावा ॥ ६२ ॥

नित्य प्रातःकाळीं उठोन ॥ देउळीं कीजे सडासंमार्जन ॥ नंतर सरोवरीं स्नान करून ॥ करा भजन आदरें ॥ ६३ ॥

ऐसें तयातें स्वयें निवेदिलें ॥ तथास्तु म्हणॊन तेंही वंदिलें ॥ मग आचारूं लागले ॥ तैसेंची उभयतां ॥ ६४ ॥

नित्य सडासंमार्जन करिती ॥ सरोवरीं स्नानें सारिती ॥ अष्टौप्रहर भजन करिती ॥ न सोडिती दिनरजनीं ॥ ६५ ॥

नित्य होता माध्यानकाळ ॥ मेळवूनि आणिता ती फळें ॥ देवातें अर्पूनि सकळ ॥ शेष भक्षिती उभयतां ॥ ६६ ॥

ऐसें क्रमितां भावार्थे ॥ स्वामिया नवल वर्तलें तेथें ॥ कृपाळू जाला रमानाथ ॥ परम भावार्थ जाणुनी ॥ ६७ ॥

मलमास होता संपूर्ण ॥ तंववरी केले आचरण ॥ प्राप्त झाला शेवटील दिन ॥ जालें विंदान तें ऐका ॥ ६८ ॥

सहजीं जालें प्रातःस्नान ॥ सर्वही पर्वणी साधिली तेणें ॥ व्यतीपात पूर्णिमा जाण ॥ द्वादशी अमावास्या ते ॥ ६९ ॥

कवण पर्वणी कवणें ठायीं ॥ हे तों तयातें ठाउकेंची नाहीं ॥ परी कृपाळू तो शेषशाई ॥ केली नवाई ते ऐका ॥ ७० ॥

सहजी घडले तया उपोषण ॥ करितां वनफळातें भक्षण ॥ जिव्हा रंगली नामेंकरून ॥ जाहलें दहन पापाचें ॥ ७१ ॥

सप्तजन्मांचे गेले पाप ॥ तंव विमान उतरलें आपोआप ॥ करून उभयतां दिव्यरूप ॥ निजस्वरूपी ठेविलें ॥ ७२ ॥

येवढें नाममहिमान आगळें ॥ महापापिये उद्धरिलें ॥ स्वनयनीं आम्ही देखिलें ॥ म्हणोन कथिलें स्वामिया ॥ ७३ ॥

ऐसे इतिहासालागून ॥ अंगिराऋषी तें कथी नृपनंदन ॥ ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण ॥ तेणें नारायण कृपा करी ॥ ७४ ॥

पुनः रायें ऋषी अर्चिला ॥ नमस्कारोनि बोळविला ॥ रायें संपादोन व्रताला ॥ केलें उद्यापनाला विधिनें ॥ ७५ ॥

मग तो पत्‍नीसहित भूप ॥ विष्णुलोकीं राहिला सुखरूप ॥ इतिहास हा अपरूप ॥ स्वयें निवेदी नारायण ॥ ७६ ॥

लभते भगवद्‍भक्तिं भुक्तिमुक्तिप्रदायिनीं ॥ मुहूर्ते वा मुहूर्तार्धंयस्तिठेद्धरिमंदिरे ॥ ५ ॥

ऐसी भगवद्‍भक्ति करितां ॥ विष्णुलोका पावलीं उभयतां ॥ यालागीं मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ता ॥ ह्रदयीं अनंता आठविजे ॥ ७७ ॥

पाहातो वीर आणि पत्‍नी ॥ काय साधन केलें तयांनी ॥ सहजीं सहज संमार्जनीं ॥ नेलें उद्धरोनीं भगवंतें ॥ ७८ ॥

यालागीं भावार्थे करून ॥ वश्य राहो जनार्दन ॥ चुकेल तुमची यमयातना ॥ सत्य माना वचनातें ॥ ७९ ॥

ऐसा संवाद लक्ष्मीनारायणीं ॥ तोची विस्तारिला श्रोतियांकरणीं ॥ जोडुनियां बद्धपाणी ॥ अनुसरा दिनयामिनी पैं ॥ ८० ॥

इति श्रीमलमाहात्म्यग्रंथ ॥ पद्‍मपुराणींचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ सप्तविंशतितमोऽध्याय रसाळ हा ॥ २७ ॥ ओव्या ॥ ८० ॥ श्लोक ५ ॥

॥ इति सप्तविंशतितमोऽध्यायः ॥

Adhik Maas Marathi Adhyay 28

Featured Post

Mohini Ekadashi 2025

Mohini Ekadashi 2025, Mohini Ekadashi Vrat Katha in Hindi Mohini Ekadashi  falls on the ekadashi (11th day) during the Shukla Paksha (the...