x Durganavratri.in: Adhik Maas Katha Marathi Adhyay 26

Adhik Maas Katha Marathi Adhyay 26

अधिकमास माहात्म्य अध्याय सव्विसावा

 (Adhik Maas Marathi Adhyay 26, Purushottam Maas Marathi Adhyay 26)

Adhik Maas Katha Adhyay 26 Marathi

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ जयजयाजी अनाथनाथा ॥ सगुणस्वरूपा कृपावंता ॥ ग्रंथारंभीं प्रार्थितों समर्था ॥ चरणीं माथा भावार्थे ॥ १ ॥

दिननाथ म्हणती कीं तुजला ॥ तरी काय नामातें विसरला ॥ षड्‍रिपु गांजिती मजला ॥ हें काय तुजला उचीत ॥ २ ॥
आम्ही तव अनाथदीन ॥ गांजिले प्रपंचवेदनेनें ॥ हें तव कौतुक पाहून ॥ लाजिरवाणें लौकिकीं ॥ ३ ॥
माता उपेक्षिना बाळातें ॥ तेवि तूं जगदीश जगातें ॥ उपेक्षिता दीनदासातें ॥ केवि हेतूंतें शोभेल ॥ ४ ॥

हरी तूं नाना अवतार धरिसी ॥ दीनदासातें प्रतिपाळिसीं ॥ तेथें मज दीनातें उपेक्षिसी ॥ केवि मिरविसी थोरीव ॥ ५ ॥

आतां श्रोते सज्जन हो ऐका ॥ चित्त करून एकाग्र देखा ॥ भाव धरूनियां निका ॥ संपूर्ण ऐका ग्रंथ हा ॥ ६ ॥
उपेक्षिता निज मनी ग्रंथ ॥ तरी केवि प्राणियांचा प्रांत ॥ यदर्थी इतिहास श्रीअच्युत ॥ अनुवादत लक्ष्मीये ॥ ७ ॥
तोचि भावार्थ संपूर्ण ॥ श्रोतेहो करा श्रवण ॥ लक्ष्मीते वदलासे नारायण ॥ तेचि श्रवण अवधारा ॥ ८ ॥
अत्र ते कथयिष्यामि कथां पापप्रणाशिनीं ॥ यांश्रुत्वा ब्रह्महास्तेनो मुच्यते योनिसंकटात ॥ १ ॥
लक्ष्मीतें वदे नारायण ॥ जे ऐकती भावें करून ॥ तयांचे पाप होय दहन ॥ संकटी जाण न पडती ते ॥ ९ ॥
ऐसें वाक्य तयाचें पाहे ॥ कोण अभागीं उपेक्षूं लाहे ॥ उपेक्षितां कोण दशा होय ॥ तेचि आयकावी सावकाश ॥ १० ॥
वीरबाहुर्नृपः पूर्वमासीभ्दूमितलेखिले ॥ दातायज्वा सुरूपश्‍च सुभगोजनवल्लभः ॥ २ ॥
पूर्वी वीरबाहु राजेश्‍वर ॥ महीमंडळीं कीर्ती अपार ॥ परम धार्मिक अति उदार ॥ दानशूर प्रतापी ॥ ११ ॥
सगुणस्वरूप ऐश्‍वर्यसंपन्न ॥ सर्वरायामाजी श्रेष्ठमान ॥ आप्तवर्ग प्रजानन ॥ चिंतिती कल्याण रायाचें ॥ १२ ॥
ऐसा भूप सर्वांगुणीमंडित ॥ विवेकी जैसा वसिष्ठ सत्य ॥ सेना जयाची अपरिमित ॥ प्रजा पाळित स्वधर्मेसी ॥ १३ ॥
तयाची भार्या रूपवती सती ॥ नाम जाण यशोमती ॥ उभयतांची अत्यंत प्रीति ॥ असें निश्चिती जाण पां ॥ १४ ॥
यौवनगर्वे नसे गर्विष्ठ ॥ लावण्यामाजी असे श्रेष्ठ ॥ प्रधान रायाचा धर्मिष्ठ ॥ अति निकट स्नेहकाजीं ॥ १५ ॥
राज्यभार चालवी नेटका ॥ धाक ज्याचा सर्वांसी देखा ॥ स्वधर्मेसी अतिविवेका न शिवे देखा पापातें ॥ १६ ॥
तया राजयाचा मंत्री चतुर ॥ तेथें यथा न्यायें चाले राज्य भार ॥ तया देशीं अन्य विचार ॥ न घडे साचार निर्धारेसी ॥ १७ ॥
असो ऐसे असतां जाण ॥ राजपत्‍नी सर्वगुणेमंडन ॥ स्वरूपजाळें पसरून ॥ आकर्षिला मनमीन रायाचा ॥ १८ 
सदासर्वदा विषयासक्त पाही ॥ दानधर्म किंचित नेणें काहीं ॥ वपूभूषणातें सर्वकाळ देहीं ॥ सांवरितसे सायासें ॥ १९ ॥
न दानं न व्रतं वपि न देवार्चनसेवनं ॥ भुंक्‍तेभोगाननेकांश्च वपुभूषणतत्परः ॥ ३ ॥
ऐसि ते राजभार्या जाण ॥ कदांही न करी धर्मदान ॥ नेणे तीर्थपर्वणी गंगास्नान ॥ करी अमान्य सर्वही ॥ २० ॥
पुरोहित सांगतां त्रासले बहुत ॥ कदांही न करी तो दानव्रत ॥ पहा ही अनकूळ असतां त्वरित ॥ नाहीं हेत धर्मावरी ॥ २१ ॥
तयाते पुत्र असती दोन ॥ सुबाहु शतबाहु नामें जाण ॥ तेही स्वरूपेमंडण ॥ गुणसंपन्न आगळे ॥ २२ ॥
एकदा मलमासाचिये संधी ॥ प्रधान स्त्रीकरून अवधी ॥ म्हणे बहुत दिन न घडे विधी ॥ राजस्त्री दर्शनातें ॥ २३ ॥
म्हणूनि साधूनियां वेळ ॥ प्रधानस्त्री निघे तात्काळ ॥ परम जालीसे उतावेळ ॥ राजस्त्रियेचे दर्शनी ॥ २४ ॥
दर्शनाची धरून लालसा ॥ भेटी पातली ते म्हाळसा ॥ सुंदरपणें तिचिया वयसा ॥ शिबिकेमाजी आरूढे ॥ २५ ॥
दूती जाणविति स्वामिणीतें ॥ प्रधानभार्या पातली दर्शनाते ॥ ऐसी ऐकताची मात ॥ सामोरी येत गजगामिनी ॥ २६ ॥
तियेतें धरून निज हस्तकीं ॥ बैसविती जाली निज मंचकीं ॥ येरी स्वभावें तेजा विलोकी ॥ तंव अपूर्वता देखत ॥ २७ ॥
इंद्रभुवना ऐसें रम्य सदन ॥ रत्‍नें विखुरलीं चहुकडून ॥ सूर्यप्रभेसमान जाण ॥ शोभे सदन तियेचें ॥ २८ ॥
तेही अलंकारयुक्त घवघवीत ॥ सुस्वरूपें असे नटत ॥ पयोधर सर्वदां उघडी झांकित ॥ अचळ सरसावित वेळोवेळा ॥ २९ ॥
अपार तेथें दासदासी ॥ सदां सादरता सेवेसी ॥ काय बोलेल केधवां वचनासी ॥ न हालें नेत्रासी पातिया ॥ ३० ॥
ऐसे देखून ते प्रधानजाया ॥ मंजुळ वचनें राजभार्या ॥ नमूनि तिचिया पायां ॥ काय बोले आदरासी ॥ ३१ ॥
तंव प्रधान भार्य ते गुणवती ॥ ते काय वदतसे सती ॥ म्हणे ऐके बाई यशोमती ॥ वचनाप्रती मान देई ॥ ३२ ॥
हा तव मलमास अतिउत्तम ॥ प्राप्त जाला केशव पुरुषोत्तम ॥ तरी स्नानदान यथानुक्रम ॥ उभयता संपादूं एकमास ॥ ३३ ॥
अघटित तेथींचे महिमान ॥ मागुता साध्य नव्हे ऐसा दिन ॥ नेणो कवण वेळकाळ कठिण ॥ घडो शके नेणवे तें ॥ ३४ ॥
यालागी राजसे पाहीं ॥ आयुष्य तंव आपुलें नाहीं ॥ यदर्थी आपण उभयतांही ॥ आचरो देहीं व्रतातें ॥ ३५ ॥
सकळ पदार्थ अनुकूळ ॥ दानधर्म करूं सर्वकाळ ॥ सौभाग्यवर्धन होय सकळ ॥ पुत्र आणि कलत्रेसी ॥ ३६ ॥
तव आज्ञे माजी भूपती ॥ वरी धार्मिक तयाची रीती ॥ तो कदांही वारिना तुजप्रती ॥ करिता दान पद्धती यथाक्रमें ॥ ३७ ॥
ऐसें ऐकूनि तिचिया उत्तरा ॥ बोले कांहींते राजदारा ॥ अव्हेरुनी वचनामृत सारा ॥ बोले सुंदर ते ऐका ॥ ३८ ॥
म्हणे ऐकहो गुणवंतीबाई ॥ कैचें दान कैचें व्रत पाहीं ॥ कोण कष्ठवी या देहीं ॥ फळ कायी आचरूनीं ॥ ३९ ॥
आतां आचरावें व्रतातें ॥ तें फळ पुढें प्राप्त होतें ॥ देव देईल म्हणोनि संकल्पातें ॥ आशा अंतरातें धरूनी ॥ ४० ॥
ऐसा आचरावा जरी नेम ॥ तरी कवण जाणे पुढील जन्म ॥ काय वोढवेल नेणो कर्म ॥ पाहुनियां धर्म कोण आला ॥ ४१ ॥
दानधर्म करून सर्व जन ॥ मृत्यु पावले ते नाहीं आले परतुन ॥ नेणों स्वर्गी जाचणी कीं सन्मान ॥ पाहुनिया कोण परतले ॥ ४२ ॥
वृथा कष्टवावें शरीरातें ॥ काय उणें केलें भगवंतें ॥ सर्व अनुकूळ आहे आम्हांते ॥ ऐक निरुते भामिनी ॥ ४३ ॥
धन मागावें श्रीहरी ॥ सर्व संपत्ती अनुकूळ घरीं ॥ पुत्र मागो इच्छा अंतरी ॥ तरी असती निर्धारीं पुत्र दोघे ॥ ४४ ॥
तेही सगुणसंपन्न ॥ सर्वगुणमंडित पूर्ण ॥ वर्तती आमुचे वचनाधीन ॥ न मोडिती वचन कदां ते ॥ ४५ ॥
जेवी शिव आणि भवानी ॥ तेवीं मानिती आम्हां उभयतालागुनी ॥ तयांची मान्यता सर्व जनीं ॥ जयविजय सुरलोकींचे ॥ ४६ ॥
मीही स्वरूपें सुंदर अंगना ॥ रूपाभिमानें न मानी कोणा ॥ माझिया ऐश्वर्यपुढें उणा ॥ इंद्र ठेंगणा मी मानीं ॥ ४७ ॥
सदांसर्वदा मजलागीं ॥ नृप संतोषवि स्वअंगी ॥ प्राण वेंचील वचनालागीं ॥ माझियां नृपेंद्र तो ॥ ४८ ॥
परम प्रीती आम्हां उभयतां ॥ ऐसें ऐश्वर्य मज असतां ॥ तेथें व्रत प्रभावाची वार्ता ॥ काय भगवंता मागावें ॥ ४९ ॥
आतां व्रत आचरावें कोणी ॥ तेंही ऐकपां कहाणी ॥ सदा पीडिलें जे दरिद्रेंकरूनी ॥ व्रत तयानें करावें ॥ ५० ॥
अन्नवस्त्र न मिळें किंचित ॥ पोटीं नाही ज्याचिया संतत ॥ त्यानें करावें पै व्रत ॥ आणीक मात अवधारी ॥ ५१ ॥
व्याधियुक्त असतां शरीरीं ॥ तयानें जपावा हरिहरी ॥ किंवा एकचि पुत्र संसारी ॥ तोही नायके पितयाचें ॥ ५२ ॥
सदां सर्वकाळ मातापिता ॥ देखों न शकेची सर्वथा ॥ ऐसीं जेथें असे व्यवस्था ॥ तयानें या व्रता आचरावें ॥ ५३ ॥
व्रत आचरतां संपूर्ण ॥ मनीं हेतु हाचि पूर्ण ॥ व्हावें माझें कल्याण ॥ करावें म्हणोन व्रत हें ॥ ५४ ॥
तरी श्रीहरी कृपेकरून पाही ॥ सर्व अनकूळ मजलागीं बाई ॥ मज नसेची वासना कांही ॥ व्रतप्रभावीं साजणीये ॥ ५५ ॥
ऐसी तिचीया वचनाची हेळणा ॥ करिती जाली नृपांगना ॥ कोणी जावें तीर्थाटणा ॥ कष्ट जाणा शरीरातें ॥ ५६ ॥
अमृता ऐसें तिचें वचन ॥ येरी मानी तृणसमान ॥ जेवीं अमृतकुंभ नेऊन ॥ उकरडां ओती अभागी ॥ ५७ ॥
जेवी एकादिया सद्‍बुद्धि सांगता ॥ तो तंव नायकेची तत्वतां ॥ मग तयातें प्रस्तवा होतां ॥ कुसुकुसी मनामाजी ॥ ५८ ॥
तैसा प्रकार येथें जाला ॥ नायके शिकविल्या बोला ॥ अव्हेरूनि सती गुणवतीला ॥ अपायाला वाट केली ॥ ५९ ॥
असो होणार तें कां सुखें ॥ ऐसें मानुनिया निकें ॥ आज्ञा घेऊन तात्काळीकें ॥ गुणवती गृहातें पातली ॥ ६० ॥
तंव ते गुणवती प्रधानकामिनी ॥ आरंभिती जाली व्रता लागुनी ॥ यथापूर्वक भावार्थ मनीं ॥ चक्रपाणी आराधितसे ॥ ६१ ॥
येरीकडे यशोमती सती ॥ भोगसमयीं येतां नृपती ॥ अवघा समाचार तयाप्रती ॥ जाली सांगती आदरेंसी ॥ ६२ ॥
नृपें उत्तर न देतां तयेला ॥ संपादित झाला भोगवळा ॥ तंव अपूर्व जालीसे लीळा ॥ ते सकळांलागीं परिसवूं ॥ ६३ ॥
कठोर शब्द न साहवे मानवियां ते ॥ मग तो तव साक्षांत अनंत ॥ जाणें सर्वांचे ह्रद्‌गत ॥ दूषण वृथा ठेविलेंस ॥ ६४ ॥
म्हणोनि कोपला नारायण ॥ ज्वर प्राप्त झाला न लागतां क्षण ॥ राजभार्या अत्यंत व्याकुळ जाण ॥ शांत नव्हे जाण ज्वर पैं ॥ ६५ ॥
अत्यंत भूतज्वर आंगीं ॥ प्राण जाऊं पाहे लगबगी ॥ वार्ता फांकतांची जगी ॥ नृप वेगी पातला ॥ ६६ ॥
पुत्र ही धाविन्नलें वेगें ॥ सन्निध पातले निजांगें ॥ दास दासी अपार वेगें ॥ पातलें वेगें त्या ठायी ॥ ६७ ॥
बहुतांपरी उपचार ॥ करविता जाला नृपवर ॥ औषधी देतां नव्हे बरें ॥ अधिकाधिक व्यथा जाची ॥ ६८ ॥
घाबरे जाले नगरवासी ॥ उरस्फोट नृपवरासी ॥ रुदित शब्द न फुटे पुत्रासी ॥ दासदासी आकांत ॥ ६९ ॥
तंव तो मंडन प्रधान पाहीं ॥ स्त्रीसहीत धांवत आला, लाहीं ॥ तंव तेथें दुःखाते पारच नाही ॥ समजावित नाही कोणी कोणा ॥ ७० ॥
शांतवितां मंडन प्रधान ॥ उगे न राहती नृपनंदन ॥ राजयाचे अश्रुपूर्ण ॥ देखे प्रधान निजनयनी ॥ ७१ ॥
करपल्लवे समस्तातें ॥ प्रधानें शांत केले तेथें ॥ तंव गुणवती प्रधानभार्या ते ॥ अंतरगृहातें पातली ॥ ७२ ॥
निवारून सकळ स्त्रियांचा मेळा ॥ आपण पातली यशोमतीजवळा ॥ निवारुनि सकळ दुःखकल्लोळा ॥ उपचार केला बहु तेणें ॥ ७३ ॥
तितुकियामाजी काय झालें ॥ राजयोषितेने अवलोकिले ॥ तव गुणवतीचे मुख चांगले ॥ सुशोभित देखिले निजनयनी ॥ ७४ ॥
हरिद्रकुंकुम लेत वदनी ॥ माथा शेंदुरसुशोभिनी ॥ अंजन घालूनिया नयनीं ॥ देखे भामिनी रायाची ॥ ७५ ॥
मुखी तांबूल असे रंगला ॥ अलंकारेमंडित ते अबळा ॥ देखती जाली राजवेल्हाळा ॥ देखूनि कपाळा आठी घाली ॥ ७६ ॥
मग बोले राजयोषिता ॥ कोण काळ श्रृंगारकरिता ॥ सकळिका शोक अवस्था ॥ श्रृंगारिया लज्जा नसे ॥ ७७ ॥
तरी उठे आता येथूनी ॥ जाई आपुल्या सदनी ॥ आली श्रृंगार सावरुनी ॥ दर्शनालागुनी माझिया ॥ ७८ ॥
ऐसे वदता तियेते ॥ येरिचे काय चाले तेथे ॥ स्वामिये निखादितां सेवकाते ॥ न चाले तेथे दुजियाचे ॥ ७९ ॥
राजा कोपला प्रजा ते पाही ॥ सर्व संपत्ति लुटिता होई ॥ तेथे दुजियाचा उपाय नाही ॥ तैसीच नवाईही दिसे ॥ ८० ॥
असो कोपारूढ राजजाया ॥ देखून उठली प्रधानभार्या स्वगृहा पातली लवलाह्या ॥ सखेदयुक्त अंतरी ॥ ८१ ॥
येरीकडे नृपसुंदरी ॥ भ्रूसंकेते ते अवसरी ॥ नृपालागी अत्यादरी ॥ पाचारी जवळीके ॥ ८२ ॥
म्हणे काही पाहिले कौतुक ॥ येरु म्हणे नाही देखिले सम्यक ॥ ती म्हणे तुम्ही भोळे भाविक ॥ नेणा कौतुक स्त्रियांचे ॥ ८३ ॥
मज प्राप्त झाले हे दुःख ॥ तुम्ही सकळ करितसा शोक ॥ प्रधानस्त्री गुणवती देख ॥ आली निःशंक श्रृंगारुनी ॥ ८४ ॥
काही दुःख न वाटे तिचे मनी ॥ विपरीत मनामाजी करणी ॥ म्हणोन आली श्रृंगारुनी ॥ लज्जा मनी न वाटे ॥ ८५ ॥
ती सेवक मी स्वामिणी ॥ हा भाव नसे तिचे मनी ॥ ऐसी ती सेवकाची करणी ॥ नायको कानी स्वामिया ॥ ८६ ॥
ऐसें बोलविले नृपांतरा ॥ दूर त्यजीते राजसुंदरा ॥ ऐकून कांतेच्या उत्तरा ॥ जाला संचार क्रोधाते ॥ ८७ ॥
परम अविवेकी तो भूपती ॥ ऐकून स्त्रियांची वचनोक्ती ॥ अनुसरला अक्रिय गती ॥ तेची पद्धती अवधारा ॥ ८८ ॥
जो स्त्रीबुद्धीते लागला ॥ तो सर्वीसर्वस्वे बुडाला ॥ तो अपायी पडे भला ॥ संशय याला नसेची ॥ ८९ ॥
तव राये क्रोधेकरून ॥ प्रधान कर्षिला तो मंडण ॥ पायी शृंखळा दृढ घालून ॥ गृह लुटून पै नेले ॥ ९० ॥
तयाची सकळ संपत्ति ॥ आणविता जाला भूपती ॥ प्रधान दंडिला हे ख्याती ॥ नगरामाजी प्रगटली ॥ ९१ ॥
पहा प्रभूचे कैसे विंदान ॥ चाले जो सत्क्रियेकरून ॥ तयावरी अपाय कोसळती जाण ॥ परी धैर्य ठाण न सोडावे ॥ ९२ ॥
गुणवती आचरता व्रत बरवे ॥ प्रधान कर्षून ठेविला राये ॥ परी डगमगेना तिचे ह्रदय ॥ न सोडी सोय व्रताची ॥ ९३ ॥
गृहीचे नेले सर्व धन ॥ परी न कंटाळे तिचे मन ॥ म्हणे व्रत न होता पूर्ण ॥ केवी टाकू मध्यंतरी ॥ ९४ ॥
व्रत आचरे सायासी ॥ वृत्तांत कळला रायासी ॥ मग बोलावू पाठविली दासी ॥ पतिव्रते सन्निध ॥ ९५ ॥
नृप जो पाहे विलोकुनी ॥ तंव अलंकारयुक्त कामिनी ॥ कुंकुमयुक्त शोभित वदनी ॥ नृपै मनी जाणिलें ॥ ९६ ॥
म्हणे कांता बोलिली सत्य ॥ सांप्रत नव्हे असत्य ॥ ही तंव जाया सुशोभित ॥ नव्हे दुःख कालत्रयी ॥ ९७ ॥
मग क्रोधयुक्त होऊन पाहीं ॥ तियेतें ठेविलें कारागृहीं ॥ उभयतां तें एकचि ठायी ॥ ठेविलें असे निर्धार ॥ ९८ ॥
परी तेथेंही न सोडी व्रता ॥ नित्य आचरे प्रधानकांता ॥ तंव एके दिनीं प्रधानतत्वता ॥ जाला बोलतां स्त्रियेतें ॥ ९९ ॥
म्हणे आपण उभयतां कारागृही ॥ कवण दुःख अवस्थादेही ॥ व्रत आठवलें कैचें कायी ॥ अपरूप नवाई देखों ॥ १०० ॥
मंडण उवाच ॥ न जाने कर्मण: कस्य विपाकोयमुपस्थितः ॥ गुणवत्युवाच ॥ देवसेवकवर्गस्य स्वाम्यायत्तं च जीवितं ॥ ४ ॥
तंव वदे तेव्हां गुणवती ॥ बोलतसे पतीप्रती ॥ हे नाथ जाणत जाणतवृत्ती ॥ केवि निरुती करितसां ॥ १ ॥
आपुला तो सेवक धर्म ॥ तो आपण ये साधिला नेम ॥ नेणो अव कर्माकर्म ॥ हें पुरुषोत्तम सर्व जाणे ॥ २ ॥
मग बोले प्रधान मंडन ॥ हे तो माझी कर्मरेषा पूर्ण ॥ पायी जाल्या श्रृंखळाबंधन ॥ उभयतां आपण दुःख भोगूं ॥ ३ ॥
मजकरितां तूंतें पाही ॥ दु:ख होतसे ह्रदयी ॥ येरी उत्तर देतेसमयीं शेषशायी निवारिता ॥ ४ ॥
विष्णुर्विश्‍वंभराभारधरणैकधुरंधरः ॥ श्रीधरः परमेशानः सर्व दुःखनिकृंतनः ॥ ५ ॥
म्हणे हे नाथ चूडामणी ॥ चिंता न कीजे निजमनी ॥ विश्‍वंभर चक्रपाणी ॥ आधार त्रिभुवनीं जयाचा ॥ ५ ॥
तयाची हे सर्वसत्ता ॥ त्रैलोक्य प्रतिपालिता ॥ जाणे सर्वांचे मनोगता ॥ हिताहिता सर्वही ॥ ६ ॥
तरी दृढ भाव तयाचे पायीं ॥ निवांत राहावेम ह्रदयीं ॥ आठवूनियां शेषशायी ॥ तोची सर्व निवारिल ॥ ७ ॥
ऐसें सतीचें नेमवचन ॥ ऐकून स्वस्थ राहे प्रधान ॥ येरी भावार्थ मनी धरून ॥ करी संपूर्ण व्रतपैं ॥ ॥ ८ ॥
होतां व्रताची संपूर्णता ॥ मग मज आठवूं जाला तत्वतां ॥ उणे येऊं पाहा पैं आतां ॥ न करिती व्रता कोणीही ॥ ९ ॥
ऐसें जाणून अंतरी ॥ स्वप्नीं जागृत केला नृपकेसरी ॥ तयातें बोलता जाला वैखरी ॥ अवधारीं सुंदरी तेची तूं ॥ १० ॥
स्वप्नामाजी रायातें पाही ॥ जागृत केलें ते समयीं ॥ मूर्खा सावध आतां होई ॥ बोलतों काई ते ऐक ॥ ११ ॥
विनाअपराधें तत्वतां ॥ कारागृहीं राखिले उभयतां ॥ प्रधान आणि त्याची कांता ॥ तरी अन्याय कोणता तयांचा ॥ १२ ॥
ते गुणवंती परम सज्ञान ॥ ते प्रबोधी यशमतीलागून ॥ मलमास व्रताचर्ण ॥ आचरूं जाण उभयतां ॥ १३ ॥
तें न आणितां निजमनीं ॥ केली व्रताची हेळणी ॥ तयायोगें ज्वर अद्‍भुत सदनीं ॥ कष्टी होत तव जाया ॥ १४ ॥
गुणवती भावार्थेकरून ॥ व्रत करिती जाली आपण ॥ भेटीस येता तुझिया कांतेनें ॥ विपरीत मनीं भावलें ॥ १५ ॥
ते तंव सदैव सुवासिनी ॥ संभ्रमें भरित सौभाग्यखाणी ॥ कज्जकुंकुमातें स्वीकारूनी ॥ पातली सदनीं तुझिया ॥ १६ ॥
तें तंव देखता मनीं ॥ क्षोभ पावली कामिनी ॥ तूंतें भासवून विपरीत करणीं ॥ घातलें बंधनीं उभयतां ॥ १७ ॥
तरीं तेथें अन्याय केउता ॥ तुवां विचार न करितां नृपनाथा ॥ गृह लुटून तत्वतां ॥ बंदी उभयतां कारागृहीं ॥ १८ ॥
ते गुणवती सुशीळा ॥ पुण्यलेश तियेतें घडला ॥ तरी मुक्त करीं उभयताला ॥ देऊनि धनाला सर्वही ॥ १९ ॥
इतुकें करीं सत्वर आतां ॥ सन्मानें बोळवीं उभयतां ॥ हें जरी न करिसी नृपनाथा ॥ तरीं आत्मघाता पावशील ॥ २० ॥
ऐसें स्वप्नीं सांगोन शेषशायी ॥ गुप्त जाले ठायींचे ठायीं ॥ रावो जागृत होता ह्रदयीं ॥ मानी नवाईअद्‍भुत ॥ २१ ॥
मग घाबरेपणें ते वेळीं ॥ स्वप्न सांगे स्त्रियेजवळी ॥ ऐकतां ते ही चाकाटली ॥ अंतरीं कळली निज खूण ॥ २२ ॥
मग म्हणे जी नृपनाथा ॥ तयातें सत्वर मुक्त करा आतां ॥ नाहींतरी बरी न दिसें व्यवस्था ॥ होईल घाता आपुलिया ॥ २३ ॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ दचकलें रायाचें मन ॥ मग तैसाच बंदिशाळे येऊन ॥ उभयतांलागून नमियेले ॥ २४ ॥
श्रृंखळाबंधनीं मुक्त केला ॥ कांतेसहि गौरविला ॥ नूतन वस्त्रें देता जाला ॥ कारभार वोपिला मागुती ॥ २५ ॥
वस्तुजात सर्वही तयाचें ॥ तेंही अर्पण केलें साचें ॥ बोलूनियां नम्र वाचें ॥ सर्वस्वातें क्षमा मागें ॥ २६ ॥
गुणवती सती परममंगळा ॥ राव नमस्कारी वेळोवेळा ॥ रावभाजेतेही आराम वाटला ॥ परी कंठ दाटला सद्‍दीत ॥ २७ ॥
मौन्येंची नमस्कारिली सती ॥ कांहीं न बोलवेंची पुढती ॥ करीं अपराधाची शांती ॥ नवलरीति अनुपम्य ॥ २८ ॥
ऐसें मलमास व्रता ॥ मग त्या आचरती उभयतां सकळ सौभाग्यसरिता ॥ जाली प्राप्तता तयातें ॥ २९ ॥

मग नागरिकवासी सकळ ॥ व्रत करिते जाले अचळ ॥ तयेनगरीं काळवेळ ॥ नोहे दुष्काळ कदांही ॥ ३० ॥
ऐसें हें मलमाहात्म्यआख्यान ॥ अव्हेरितां काय जालें कथन ॥ तेंची तूंतें केलें निवेदन ॥ सत्य जाण भामिनिये ॥ ३१ ॥
तोची अर्थांतरबरवा ॥ श्रोतियतें निवेदिला आघवा ॥ न घडे तरीं न हेळसावा ॥ प्रत्ययो घ्यावा श्लोकांतरीं ॥ ३२ ॥
इतिश्रीमलमाहात्म्यग्रंथ ॥ पद्‍मपुराणीचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ षड्‍विंशतितमोऽध्याय गोड हा ॥ २६ ॥ 
ओव्या १३२ ॥ श्लोक ५ ॥
 
॥ इति षड्‍विंशतितमोऽध्यायः ॥

Featured Post

Varuthini Ekadashi 2029 Date

Varuthini Ekadashi 2029 Date Varuthini Ekadashi is one of the important Ekadashi fasts observed in Hindu tradition. It falls during the  Kri...