Adhik Maas Katha Marathi Adhyay 30

अधिकमास माहात्म्य अध्याय तिसावा

 (Adhik Maas Marathi Adhyay 30, Purushottam Maas Marathi Adhyay 30)

Adhik Maas Katha Adhyay 30 Marathi

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी श्रीरामा ॥ अनुपम्य तुझा महिमा ॥ तव कृपा बळें माझिया नेमा ॥ सिद्धि पावविलें दातारा ॥ १ ॥

मार्गे कवी थोर थोर झाले ॥ तयांनी अपार ग्रंथ केले ॥ तूं तें गीतीं आळवीत गेले ॥ तुवा धावणें केलें तात्काळीं ॥ २ ॥

तयाची येथें न साजे उपमा ॥ मी तंव अधमामाजी अधम ॥ नाहीं क्रिया दानधर्म ॥ नाही सुगम उपाव ठावा ॥ ३ ॥

वाचेसही नाहीं मधुरता ॥ किती आळवावे रघुनाथा ॥ त्याही वरी दरिद्र अवस्था ॥ सदा वाहे चिंता हळहळ ॥ ४ ॥

तेथें मी काळ कैसा क्रमावा ॥ म्हणोन उद्‌गार जाला जिवा ॥ बुद्धि दाता तू राघवा ॥ तुझिया भावा अगम्य ॥ ५ ॥

हे माझी नव्हे स्वबुद्धि कविता ॥ अवघी ही तुझी सर्व सत्ता ॥ वाचेसि नाही मधुरता ॥ परि संपूर्णता तुवां केली ॥ ६ ॥

मागील कवींचे जे जे बोल ॥ ते तंव सुवासिकपुष्पें केवळ ॥ तेथें माझी वाणी केवळ ॥ धत्तुतपुष्पें जाण पां ॥ ७ ॥

समर्थे मौक्तिकांची लाखोली ॥ तुजलागीं रामा अर्पिली ॥ तेथें माझी हे वाग्वल्ली ॥ तुलसी दल समर्पिलेंसे ॥ ८ ॥

आतां कळसाध्याय तिसावा ॥ तो कृपाबळें सिद्धीते न्यावा ॥ संपूर्ण मलमहत्म्याचा ठेवा ॥ तुजप्रती देवा पावों दे ॥ ९ ॥

संपूर्ण व्रताचे जें फळ ॥ माझें तव हेंचि सकळ ॥ तुज प्रीत्यर्थ अळूमाळ ॥ पावो सकळ देवराया ॥ १० ॥

आता परिसाहो सादर ॥ श्रोते सज्ञान चतुर ॥ संपूर्ण कथिला प्रसर ॥ लक्ष्मीनारायण संवाद ॥ ११ ॥

संपूर्ण भरतां एक मास ॥ तयाची गणती तीस दिवस ॥ म्हणोनी अध्याय हे तीस ॥ जाले असती निर्धारें ॥ १२ ॥

ह्या तीस मौक्तिकांच्या माळा ॥ सभाग्य श्रोतीं घालाव्या गळां ॥ भावें अर्चिजे धनसावळा ॥ घाला गळां त्याचिया ॥ १३ ॥

किंवा हे तीस दीप उजळा ॥ भावार्थे घृत वाति घाला ॥ अंतरज्योत पे पाजळा ॥ तेणें वोवाळा लक्ष्मीरमण ॥ १४ ॥

अथवा हे तीस कुंभ जाण ॥ श्रवण जीवनें भरि जे पूर्ण ॥ भावबळें दीजे हो दान ॥ तेणें नारायण संतोषे ॥ १५ ॥

वादविवाद टाकून ॥ मूकवत करावे श्रवण ॥ तेंचि तुम्हा घडे मौन्य ॥ तेणें नारायण संतुष्टे पैं ॥ १६ ॥

ऐसिया संपूर्ण नेम ॥ अर्चिजे हो पुरुषोत्तमा ॥ तयायोगें कर्मीकर्मा ॥ मुक्त होती प्राणी पैं ॥ १७ ॥

ऐसे हे तीस अध्याय पूर्ण ॥ ग्रंथ जालासो निर्माण ॥ तुजप्रती पावो नारायण हें वाकपुष्प चरणीं अर्पिलें ॥ १८ ॥

संपूर्ण ग्रंथ जरी न हो श्रवण ॥ तरी शेवटील अध्याय हा पूर्ण ॥ श्रवण फलप्राप्ति जाण ॥ समग्र कथन ग्रंथ गर्भी ॥ १९ ॥

म्हणोन तीस अध्यायांची ॥ वेगळालीं फळे तयांची ॥ परिसवू तुम्हां तैसेची ॥ एकाग्र मन असों द्या ॥ २० ॥

मिळोन समग्र ऋषींचा मेळा ॥ सूताप्रती तयांनी प्रश्न केला ॥ सूत तयातें वदता जाला ॥ लक्ष्मीनारायण संवाद ॥ २१ ॥

मलमासाची उत्पत्ती ॥ कथिता जाला निगुती ॥ ब्राह्मणसेवा दानपद्धती ॥ सांगोन प्रथमोध्याय संपविला ॥ २२ ॥

द्वितीयोध्यायीं गोसेवा वर्णन ॥ कमलासनाचा गर्वहरण ॥ केतकी आणि धेनू तें जाण ॥ असत्य वदता पंचवदनें शापिलें ॥ २३ ॥

गोसेवाविशेष पाही ॥ निवेदिली त्रितीयोध्यायी ॥ पौलव्यऋषीतें छळितां वासवीं ॥ नवल पदवी ऐकिली ॥ २४ ॥

वासवासहीत तिन्ही देव ॥ शापावया ऋषिपुंगव ॥ उदक घेता धेनू अंगी सर्व ॥ देखता जाला ऋषी तो ॥ २५ ॥

मग उदक टाकिता झाला ॥ विवेकें क्रोध शांतविला ॥ प्रसन्न होऊन देवतामेळा ॥ ऋषि बैसविला विमानी ॥ २६ ॥

चतुर्थोध्यायी कथा बरवी ॥ ब्राह्मणसेवा निवेदिली आघवी उपरि दृष्टांती कथा लाघवी ॥ शूद्रें नेले पाही द्रव्यातें ॥ २७ ॥

नृगराज झाला सरड ॥ ब्रह्म शाप अतिप्रचंड ॥ तो कृष्णदर्शनें उद्धरिला वितंड ॥ पंचमोध्यायीं कथाही ॥ २८ ॥

सहावियामाजी कथा ॥ दानमहिमा वर्णिला तत्वतां ॥ आणि दीपदान विप्रस्त्री करितां ॥ उद्धरिला मार्जार ॥ २९ ॥

सातव्यामाजी कथा बरवी ॥ शांकली विप्र सामवेदी पाही ॥ त्यातें भार्या उभयतांही ॥ एकी अधोगती एकी उद्धारू ॥ ३० ॥

दीपदान करितां ज्येष्ठकांता ॥ धाकुटी सवत मत्सरें विध्वंसितां ॥ त्रयपुत्र नष्ट होऊन अधोगतिता ॥ प्राप्त जाली तयेतें ॥ ३१ ॥

अष्टमोध्यायीं कथानक ॥ उत्तर देशी नर्मदातीरी एक ॥ ज्योतिषी ब्राह्मण एक ॥ अतिकृपण धनवान तो ॥ ३२ ॥

कांतेनें उदक म्हणोन पय दिधले ॥ त्या योगें शेष प्रसन्नवदनें बोलें ॥ संचित द्रव्य कांतेचे बोलें ॥ देऊनि लाविलें साधनासी ॥ ३३ ॥

दक्षिण देशीं महीस्मृती नगरी ॥ विप्रस्त्री वैधव्य वृद्धाचारी ॥ तें व्रत करितां शूद्रनारी ॥ तात्काळ उद्धरी पुण्योदकें ॥ ३४ ॥

सप्तदिवसांचे स्नानोदक ॥ ती ते करीं अर्पिले देख ॥ उद्धरगती तात्काळिक ॥ वाराणसी देख जन्म झाला ॥ ३५ ॥

काशीनाथ नामाभिधान ॥ उभयता वृद्धासहीत विमान ॥ नवव्यामाजी हेचि कथन ॥ जालें संपूर्ण निर्धारें ॥ ३६ ॥

दशमामाजी कथा पाहीं ॥ अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री ॥ मौन्य व्रत करितांना होई ॥ उद्धार तयाचा ॥ ३७ ॥

अकराव्यामाजी कथा अव्यग्र ॥ पंचपर्वे सांगितलीं साचार ॥ व्यतीपात वैधृती अमावास्या थोर ॥ पूर्णिमा आणी द्वादशी ॥ ३८ ॥

द्वादशामाजी तेची कथा ॥ सांगितली पर्वाची कथा ॥ पूर्णिमा-अमावास्या तत्वता ॥ महिमा निरुता वर्णिला ॥ ३९ ॥

त्रयोदशामाजी कथा ॥ निवेदिलें त्रिरात्रीचे व्रता ॥ दशमी एकादशी सहिता ॥ द्वादशी महिमा वर्णिला ॥ ४० ॥

आणि अंबरीष नृपराणा ॥ दुर्वासें केली छळणा ॥ तात्काळ पावला नारायण ॥ चौदावा जाण असे हा ॥ ४१ ॥

श्रीरामेंव्रत करितां द्वादशी ॥ तेची व्रतें शतमुख रावणासी ॥ मुक्ति दिधली तयासी ॥ पंधराव्यासी हे कथा ॥ ४२ ॥

इंद्राची अप्सरा स्मितविलासिनी ॥ दुर्वासें शापिलें तियेलागुनी ॥ ते पिशाच्च होऊन याज्ञवल्कीची मैत्रिणी ॥ सोळाव्या माजी उद्धरिली ॥ ४३ ॥

धर्म शर्म स्वस्त्रियेसी प्रतिष्ठानता ॥ व्रत करी त्रिरात्री नेमस्ता ॥ पिशाच्य उद्धरून तत्वता ॥ सत्राव्यांत हे कथा ॥ ४४ ॥

विंध्याद्री पाठारीं जाण ॥ गर्गनामें नगरी पूर्ण ॥ तेथील एक भृगुगोत्री ब्राह्मण ॥ कन्या जाण तयाची ॥ ४५ ॥

तियेतें वैधव्य प्राप्त होतां ॥ व्रतप्रभावें अक्षयीं सौभाग्यता ॥ नामे मंगळागौरी तत्वता ॥ वाराणसीये ॥ ४६ ॥

अठराव्यामाजी हे कथा ॥ आतां एकुणिसावा तत्वता ॥ विप्रदास नामें शूद्र होता ॥ आचरे व्रता कांतेसहित ॥ ४७॥

तयानें उद्धरला राक्षस ॥ देऊनि त्रिदिनी पुण्यास ॥ आतां विसाव्या माजी विशेष ॥ कथानक परिसिजे ॥ ४८ ॥

सौराष्ट्र देशीं प्रभासनगरीं ॥ तेथील सोमशर्मा विप्र निर्धारी ॥ स्नानास जातां गंगातीरीं ॥ पिशाच्य निर्धारीं उद्धरिला ॥ ४९ ॥

सौराष्ट्र देशीं अतिसुशीळ ॥ प्रभास क्षेत्र परमविशाळ ॥ तेथील ब्राह्मण पुण्यशीळ ॥ नामें जाण सोमशर्मा ॥ ५० ॥

तयानें आचरतां व्रतास ॥ स्नाना जातां उद्धरिला राक्षस ॥ त्रिरात्री देऊनि व्रत पुण्यास ॥ विसावा निर्दोष जाणिजे ॥ ५१ ॥

विराट देशाचिये ठायीं ॥ माहुरनामें नगरी पाही ॥ रेणुक दैवत तये ठायीं ॥ अनुसूया परम पतिव्रता ॥ ५२ ॥

तेथील एक शूद्र भावार्थी ॥ विप्रसेवा करितसे दिनराती ॥ कुष्ठ भरतांच तयाप्रती ॥ गंगास्नानें उद्धरागती तो गेला ॥ ५३ ॥

असे कथानक एकविसावा ॥ आता परिसा बाविसावा ॥ नाना दानाचा वेगळा ठेवा ॥ सांगितला आदरेसी ॥ ५४ ॥

तेथें महीस्मृती नगरीं ॥ एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री ॥ तेथें नारायण राहून मंदिरीं ॥ विपरीत परी पैं केली ॥ ५५ ॥

तक्रविक्री तयाचा कुमर ॥ तात्काळ केला तयाचा उद्धार ॥ विप्रदुहिता होती जार ॥ तेहि उद्धार पावली ॥ ५६ ॥

ऐसा कथानक बरवा ॥ बावीसापासून चोविसावा ॥ आतां ऐकिजे पंचविसावा ॥ प्रेमभावा आदरेंसी ॥ ५७ ॥

मासामाजि मलमस उत्तम ॥ स्वयें वदला पुरुषोत्तम ॥ अरुंधती पार्वती संवाद परम ॥ अखंड सौभाग्य लाधले ॥ ५८ ॥

वीरबाहु नृपाची कांता ॥ तीतें प्रबोधि प्रधानवनिता ॥ ते तंव व्रताते हेळणा करितां ॥ शरिरीं अवस्था भोगिली ॥ ५९ ॥

मग मंडण प्रधान कांतेसि ॥ कारागृहीं ठेविले नृपवर त्यासीं ॥ स्वप्नामाजी येऊन ह्रषीकेशी मुक्त तयासी करविले ॥ ६० ॥

इतुका कथानक सव्विसावा ॥ पुढें ऐकिजे सत्ताविसावा ॥ समान फळव्रत प्रभावा ॥ पुसे माधव लक्ष्मीतें ॥ ६१ ॥

साधारणें करितां व्रतास ॥ कांही न लागता सायास ॥ ऎशा अधमी स्त्री पुरुषास ॥ पावली निःशेष मोक्षातें ॥ ६२ ॥

ऐसा कथानक सुशर्म नृपवर ॥ कथितसे अंगिरा ऋषेश्वर ॥ सत्ताविसाव्या माजी प्रकार ॥ जाला साचार इतुका ॥ ६३ ॥

आतां अष्टविंशति कथा ॥ पतिव्रताधर्म वदलासे तत्वता ॥ काश्मीर देशी धर्मशर्मा द्विज होता ॥ तयाची कांता पतिव्रता निःसीमा ॥ ६४ ॥

तिये तें पुत्र जाले दोन पाही ॥ ते उद्धरिले निषादियें लवलाही ॥ ऐसी तेथील पदवी आघवी ॥ अठ्ठाविसामाजी आणिजे ॥ ६५ ॥

व्रत उद्यापनाची सविस्तर ॥ कथिता जाला शारंगधर ॥ एकूणतिसाव्यामाजी समग्र ॥ हाचि प्रकार सांगितला ॥ ६६ ॥

उद्यापनावाचून व्रतसिद्धि ॥ प्राप्त होय कदाचि कधीं॥ म्हणोन उद्याचनातें आधीं ॥ आचराहो भावार्थे ॥ ६७ ॥

आतां कळस अध्याय तिसावा ॥ तो भावबळें परिसावा ॥ म्हणजे संपूर्ण ग्रंथगर्भठेवा ॥ हाता चढे अनयासेंसी ॥ ६८ ॥

जरि नित्य न घडे पुराण श्रवण ॥ तरी शेवटील अध्याय पूर्ण ॥ ऐकिजे एकाग्र मन करुन ॥ फळ संपूर्ण तो लाहे ॥ ६९ ॥

ऐसी हे तीस कमळ पुष्पमाल ॥ सभाग्य श्रोती घालिजे गळां ॥ जोडूनिया करकमळा ॥ प्रार्थितों सकळा बद्धहस्तें ॥ ७० ॥

एवं तीस अध्याय संपूर्ण ग्रंथ ॥ तुज अर्पिला श्रीरघुनाथा ॥ वदता आणि वदविता ॥ सकळसत्ता पैं तुझी ॥ ७१ ॥

मी तंव मतिमंद आळसी ॥ प्रापंच धंदा अहर्निशी ॥ नेणो कांहींच साधनासी ॥ दान धर्मासी नसें धन ॥ ७२ ॥

ऐसा मी दरिद्री अकिंचन ॥ तुझी सेवा करू नेणेजाण ॥ यालागीं कळेल तैसेम कृपादान ॥ करी रघुनंदना तूचि एक ॥ ७३ ॥

अवघ्या ग्रंथाची रचना बरी ॥ संपूर्ण जाली सागराचे तीरी ॥ तेथें पश्चिमेसी मुमुक्षुपुरी ॥ असे राजधानी सांप्रत ॥ ७४ ॥

तेथें ग्रंथ पावला सिद्धीतें ॥ नमूनिया श्रीगुरुमोरेश्वरातें ॥ तयाचेनि वरदहस्तें ॥ ग्रंथसिद्धि ते पावला ॥ ७५ ॥

उमा नामें माझी माता ॥ साध्वी ते परम पतिव्रता ॥ मनोहरनामे आमुचा पिता ॥ तया उभयतां वंदिलेंसे ॥ ७६ ॥

जैसी शिव आणि भवानी ॥ तेवीं उभयता मज लागुनी ॥ भाव धरून तयांचें चरणीं ॥ ग्रंथ कथनीं संपविला ॥ ७७ ॥

शके सत्राशे बहात्तरी ॥ साधारण नाम संवत्सरीं ॥ पश्चिमेसी समुद्रपुरीं ॥ ग्रंथ निर्धारीं संपविला ॥ ७८ ॥

ग्रंथकर्ता नामाभिधान ॥ गोपिनाथ बाहाती सर्वजन ॥ मनोहरसुत म्हणोन ॥ अभंगीं नाम जाणतें ॥ ७९ ॥

गोपिनाथ तोचि नारायण ॥ जो गोइंद्रियांचें करी पाळण ॥ तोची ह्रदयस्थ श्रीभगवान ॥ ग्रंथ जाण वदला तोची ॥ ८० ॥

म्हणोनि हा मास उत्तम ॥ नाम जाणा पुरुषोत्तम ॥ एकादशी पर्व उत्तमोत्तम ॥ कृष्णपक्ष निर्धारेंसी ॥ ८१॥

सौम्यवार असे ते दिनीं ॥ सौख्य दे सकळांलागुनी ॥ परम पर्वकाळ हरिदिनी ॥ ग्रंथकथनीं संपविला ॥ ८२ ॥

श्रोता आणि वक्ता यातें ॥ श्रवण करिती जे भावार्थे ॥ आयुरारोग्य ऐश्वर्यातें ॥ पुत्रपौत्राते तो पावे ॥ ८३ ॥

आधिव्याधि नाहीं दरिद्र ॥ मनेच्छा पुरवी रघुवीर ॥ ऐसा वदला सर्वेश्वर ॥ लक्ष्मीतें आदरेंसी ॥ ८४ ॥

इति श्रीमलमाहात्मय ग्रंथ पद्‍मपुराणासारोद्धारसंमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ त्रिंशतितमोऽध्याय गोड हा ॥ ३० ॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ इति मलमासमाहात्म्य संपूर्णंम् ॥

॥ श्री अधिकमास माहात्म्यं संपूर्णम् ॥

Adhik Maas Marathi Completed

Featured Post

Parivartini Ekadashi Vrat Katha In Hindi

परिवर्तिनी एकादशी व्रत कथा (Parivartini Ekadashi Vrat Katha In Hindi) Parivartini Ekadashi Vrat Katha in Hindi युधिष्ठिर कहने लगे कि हे प्रभ...