अधिकमास माहात्म्य अध्याय एकविसावा
(Adhik Maas Marathi Adhyay 21, Purushottam Maas Marathi Adhyay 21)
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी सद्गुरु उदारा ॥ करुणार्णवा कृपासागरा ॥ तुजवीण मज आसरा ॥ नसे दुसरा कृपाळुवा ॥ १ ॥
कृपाकटाक्षे निरखावें ॥ भक्तजन प्रतिपाळावें ॥ अर्भकापरी पुरवावे ॥ लळे माझे स्वामियां ॥ २ ॥
जी जी आळ घेतसे बाळक ॥ ते ते पिता पुरवीत देख ॥ तेवीं मी रंकानुरंक ॥ घ्यावी भाक महाराजा ॥ ३ ॥
ऐका श्रोतेजन चतुर ॥ मलमहिमा परिकर ॥ जो ऐकतां भव दुस्तर ॥ निरसें साचार अनायासें ॥ ४ ॥
सायास न करितां अनायासें ॥ सांपडे निधीचा सारांश ॥ कवडी देऊनि सांपडे परिस ॥ केवीं अव्हेरावा चतुरें ॥ ५ ॥
तैसेंचि हें मलमहात्म जाण ॥ लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण ॥ अगाध येथींचे पुण्याचरण ॥ करा साधन येवढें ॥ ६ ॥
श्रीरुवाच ॥ वदब्राह्मणसेवायाः फलं किं स्याद्दयानिधे ॥ तस्सेवयाकस्य पुनः संजातं सम्यगीहितं ॥ १ ॥
लक्ष्मी वदे जी कृपावंता ॥ मागें निवेदिली जे कथा ॥ ते आकर्णिली श्रवणपंथा ॥ परी संशय तत्वता निरसिजे ॥ ७ ॥
ब्राह्मणसेवा केलियाचें फळ ॥ अथवा दान केलिया पुष्कळ ॥ याचें कवण असे हो फळ ॥ करिता सफळ कवण जाले ॥ ८ ॥
हें सविस्तर निवेदावें ॥ कृपाळुत्वें परिसवावें ॥ जेवीं बाळकालागीं स्वभावें ॥ मुखीं घाली कवळातें ॥ ९ ॥
ऐकून लक्ष्मीची वाणी ॥ बोलता जाला शारंगपाणी ॥ म्हणे ऐके हो चतुर भामिनी ॥ परोपकारणीं बोल तुझे ॥ १० ॥
विष्णुरुवाच ॥ श्रुणुसुंदरी वक्ष्यामि द्विजसेवा महोदयं ॥ इतिहासं महापुण्यं दुःखदारिद्र्यनाशनं ॥ २ ॥
ऐके हो सागर तनये ॥ द्विजसेवा पुण्यमहोदये ॥ जे आचरलिया पापक्षय ॥ तात्काळ होय शुभानने ॥ ११ ॥
अस्तिदेशो विराटख्यो महाधनजनावृतः ॥ पुण्यवज्जनपुण्यात्मा पुण्यतीर्थशतावृतः ॥ ३ ॥
न दुर्भिक्षं कदाप्यस्मिन्कस्यचिद्पुण्ययोगतः ॥ राजवर्यस्य देवस्य वरदानप्रभावतः ॥ ४ ॥
विराट देशाचिये ठायीं ॥ एक आश्चर्य वर्तलें पाही ॥ तें परिसवूं सर्वही ॥ श्रवण करीं एकभावें ॥ १२ ॥
हें सकळ श्रवण केलियाचें फळ ॥ दुःख नासुनि जाय सकळ ॥ तरी देशी एक नगर विशाळ माहुरनाम तयाचे ॥ १३ ॥
तेथील जन समस्त पाही ॥ स्वधर्माचारी सर्वही ॥ धनवान पुत्र कलत्र पाहीं ॥ व्याधी नाहीं तिळभरी ॥ १४ ॥
दुःख दरिद्र रोग चिंता ॥ नसे कोठें तयासीं वार्ता ॥ रिक्त हस्ते न दवडिती अतीथा ॥ कथावार्ता घरोघरी ॥ १५ ॥
तेथील देवी परम दारुण ॥ रेणुका तीते नामाभिधान ॥ परशुराम जननीपूर्ण ॥ ख्याती जाण त्रिभुवनीं ॥ १६ ॥
ते जमदग्नीची भार्या पाहीं ॥ जगत्रयीं पूजिती सर्वही ॥ कामना पुरवितसे तेही ॥ भक्तजनाची आदरें ॥ १७ ॥
अनसूयामाजी महासती ॥ तें स्थानीं वसे पुण्यमूर्ती ॥ जियेची कीर्ती वाखाणिती ॥ पुराणें गाती अद्भुत ॥ १८ ॥
तेथें वसती ऋषी समुदावो ॥ जे पापा वेगळे महानुभावो ॥ केवळ अपरसूर्य पाहो ॥ वसती ते ठायी सकलही ॥ १९ ॥
तंव तेथील शूद्र असे एक ॥ साधु परम भावार्थी निष्कपट देख ॥ धनवान परम धार्मिक ॥ विप्रसेवनीं देख सादरु ॥ २० ॥
प्रतिदिनी विप्रसेवा करी ॥ भावार्थे तयाचे चरण चुरी ॥ पादप्रक्षाळपणातें उष्ण वारी ॥ स्वकरें आणून ठेवीत ॥ २१ ॥
स्वकरें चर्ची चंदनातें ॥ आंग मर्दितसे भावार्थे ॥ पुष्पमाळा गुंफोनि हाते ॥ सुवासयुक्त घालीतसे ॥ २२ ॥
शय्यावस्त्रे अलंकार ॥ देऊन तोषवी धरामर ॥ कोणी आलिया दारासमोर ॥ रिक्त हस्तें दवडीना ॥ २३ ॥
आवडे तया तेंची भोजन ॥ षड्रस घृतासहित अन्न ॥ इच्छित पदार्थ पुरवी आणून ॥ परी कदा उद्दिग्न नोहेची ॥ २४ ॥
अतिथ आलिया द्वारीं ॥ श्वानापरी गुरगुरी ॥ भार्याही वर्ते तयाचि परी ॥ म्हणती लंडभिकारी केवढा हा ॥ २५ ॥
पाठ पुरविली मागणारी ॥ उसंत नाही क्षणभरी ॥ नित्यानित्य कोठून वारी ॥ घालावीं साचार तयातें ॥ २६ ॥
ऐसा तो नसेची शूद्र रावो ॥ धन पाळना मत याचें पाहाहो ॥ नांवासारखी करणी पाहावो ॥ नित्यानित्य आचरे ॥ २७ ॥
भार्या तयाची पतिव्रता ॥ एकोमय वर्तती उभयतां ॥ नुलंघी कधी पतिवचनार्था धर्मपंथातेही वर्ततसे ॥ २८ ॥
तेही स्वअंगें नित्यानित्य ॥ विप्र स्त्रियांची सेवा करित ॥ जे मागती प्रियवस्तू ती पुरवीत ॥ नाहीं न म्हणत कदापिही ॥ २९ ॥
ऐसीं दंपत्यें उभयतां ॥ विप्रकाजीं धन वेचितां ॥ वाचें नाणितीच सर्वथा ॥ अगर्विता दोघेही ॥ ३० ॥
सेवाकरितां दोघेंही ॥ खेद न मानितीच कांहीं ॥ उल्हासयुक्त सदांसर्वदांही ॥ गर्व नाहीं तिळभरी ॥ ३१ ॥
पदरीं असलिया धन ॥ जो अगर्वित सुखसंपन्न ॥ तो ईश्वरी अंश जाण ॥ म्हणती सज्ञान विवेकी ॥ ३२ ॥
विद्या असोन विनयता ॥ धन असूनि लीनता ॥ शक्ति असूनी गर्वरहितता ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३३ ॥
धन किती वेंचिले धर्मकार्या ॥ हें स्मरणची नाहीं तया ॥ सदां करी शास्त्रचर्चा ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३४ ॥
केलें सुकृत बोले वाचें ॥ भय मानिलें लोकनिंदेचें ॥ उणें बोले दुर्जनाचें ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३५ ॥
परोपकारीं लावी वयसा ॥ धर्मकारणीं वेचितसे पैसा ॥ संसार करी वैराग्यें ऐसा ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३६ ॥
परस्त्री देखतां अंधनयनीं ॥ परनिंदा बोलतां मुका वदनीं ॥ आत्मस्तुती ऐकतां बधीर कर्णी ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३७ ॥
गेलियाचा नाहीं खेद ॥ प्राप्त जाहलिया नाहीं आनंद ॥ झगटें नेदीं अष्टमद ॥ तो ईश्वरी अंश जाणिजे ॥ ३८ ॥
ऐसिये चिन्हीं तो वर्तता ॥ शूद्र आणि त्याची कांता ॥ सन्मार्गे वर्तती उभयतां ॥ पुण्यवार्ता पूर्वीची ॥ ३९ ॥
तंव तेथें एक विपरीत ॥ वर्तलें श्रवण करीं यथार्थ ॥ शूद्राचे देहीं कुष्ट भरत ॥ अकस्मात दैवयोग ॥ ४० ॥
रक्त पू गळे रात्रंदिवस ॥ उदास झाले मानस ॥ म्हणे आचरतां स्वधर्मास ॥ केवी नाश शरीरीं ॥ ४१ ॥
आतां विप्रसेवा कैची मज ॥ क्षीणता प्राप्त जाली सहज ॥ जगीं जाली थोर काज ॥ कवण काज वांचलिया ॥ ४२ ॥
नेणों कवण पापाचा ठेवा ॥ आतां मरण दे गा देवा ॥ ऐसा उदास जाला जिवा ॥ परी आयुष्य ठेवा सरेना ॥ ४३ ॥
कैची सेवा तया विप्राची ॥ व्यथा अधिकाधिक त्याची ॥ तंव भार्या सगुण तयाची ॥ सत्य साची पतिव्रता ॥ ४४ ॥
एकदां प्रार्थी भ्रतारास ॥ म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस ॥ अधिक जाली तेणें मानस ॥ खेदरूप जाण सर्वदा ॥ ४५ ॥
तरी आतां प्राप्त झाला मलमास ॥ समग्र जाती तीर्थस्नानास ॥ तुम्हीं तों चित्तीं उदास ॥ सोडा आस प्रपंचाची ॥ ४६ ॥
धन्य तेची पतिव्रता ॥ उपदेशितसे तो भर्ता ॥ लावी मोक्षाचिया पंथा ॥ देह अवस्था जाणोनी ॥ ४७ ॥
नाहीं तरी इतर ज्या कांता ॥ रडती आपुल्या सुखस्वार्था ॥ म्हणती तुम्हीं मेलिया सर्वथा ॥ आमुची अवस्था केवी होय ॥ ४८ ॥
लेंकरेंबाळें धाकुटीं सकळ ॥ कोण करील यांचा प्रतिपाळ ॥ अहो देवा वोखटी वेळ ॥ फुटकें कपाळ आमुचें ॥ ४९ ॥
ऐसें म्हणूनी सकळ रडती ॥ परी तयाची न जाणती गति ॥ जिता द्रव्या नाश करिती ॥ मेल्या रडती सुख स्वार्था ॥ ५० ॥
हा तो अनुभव सकळांमागे ॥ अंती एकलें जाणे लागे ॥ कोणी न येती कोणा मागें ॥ प्रचीत आंगें पाहावीं ॥ ५१ ॥
तयाचें सार्थक करितां ॥ धन नवे चित्तीं सर्वथा ॥ म्हणती हे सरलिया आतां ॥ लेकुरें केउता जगती हे ॥ ५२ ॥
जन्मवरी जें धन सांचलें ॥ ते धर्मकाजीं नाहीं लविलें ॥ शेवटीही कामा नाहीं आलें ॥ सार्थकावीण गेले प्राणी ते ॥ ५३ ॥
सार्थकावीण प्राणियासि ॥ सुटका नाहीं मृत्युपुरीसी ॥ हें न जाणून मानसीं ॥ शेवटीं कासाविसी होताती ॥ ५४ ॥
यालागीं चतुर जे ज्ञानी ॥ सार्थकाविण वय न घालावें कोणी ॥ एका चक्रपाणीवांचुनी ॥ सोडविता नसे सर्वथा ॥ ५५ ॥
म्हणाल द्रव्याविण सार्थक न घडे ॥ तरीं शरीर झिजवावें रोकडें ॥ यासी तो नाहीं अवघड ॥ नामस्मरण घडे जिव्हेसीं ॥ ५६ ॥
नामस्मरणातें उसंत नाहीं ॥ रिकामीं बडबड सर्वांठायीं ॥ पुराणीं जातां अवसर नाहीं ॥ रिकामा ठाईं अनुसरत ॥ ५७ ॥
ऐसे जे व्यर्थ घालिती वय ॥ तयातें केउता तरुणोपाय ॥ कांहीं तरीं धरीं सोय ॥ आतां तूं या कर्माची ॥ ५८ ॥
दुर्लभ नरदेह लाधला ॥ बहुतां सुकृतें प्राप्त जाला ॥ तो कवडीचे बदला नाहीं आला ॥ घात केला आपुला आपण ॥ ५९ ॥
असो हा पाल्हाळ बहुसाळ ॥ श्रोते म्हणती उठलें कपाळ ॥ कथा टाकूनि पाल्हाळ ॥ व्यर्थ लाविला कवीनें ॥ ६० ॥
दृष्टांतीं बोलणें लागे ॥ म्हणोनि न याहो रागें ॥ कथा राहिली जी मागें ॥ परिसा आंगें सर्वही ॥ ६१ ॥
इतर स्त्रिया परियेसी ॥ ते शूद्र वनिता नव्हे तैसी ॥ उपदेशितसे भ्रतारासी ॥ जावें तीर्थासी म्हणोनी ॥ ६२॥
तयासीं मानलें उत्तर ॥ बुद्धीतव कर्मानुसार ॥ पूर्व सुकृत घडले साचार ॥ उभें ठाकलें येऊनी ॥ ६३ ॥
आजवरी विप्रसेवा केली ॥ तेची आतां कामा आली ॥ वासना तयाची फिरली ॥ वृत्ती मुरडली सुखस्वार्था ॥ ६४ ॥
यालागीं पहिलेंचि असावें दृढपण ॥ वेळेची कामा न पडे आठवण ॥ म्हणोनी नित्यानित्य मन ॥ व्हावें अनन्य भगवंतीं ॥ ६५ ॥
तंव तो शूद्र काय करिता जाला ॥ आकर्णोनि कांतेच्या बोला ॥ धनाचा संचय होता केला ॥ तो यथा भागें विभागिता जाला ॥ ६६ ॥
एक भाग कांतेंलागिं देत ॥ दो भाग स्वपुत्रातें देत ॥ एक आपणा पैं ठेवित ॥ तीर्थयात्रा निमित्य धर्मातें ॥ ६७ ॥
ऐसा सकळ धनाचा व्यय केला ॥ मग परिवारेंसीं निघतां जाला ॥ समागमें विप्रांचा मेळा ॥ सवें चालिला अपार ॥ ६८ ॥
मार्गी जातां सकळांचा ॥ सेवका हातीं समाचार त्यांचा ॥ घेतसे पदार्थांनी साचा ॥ करि स्वधनाचा व्यय पैं ॥ ६९ ॥
ऐसें करितां तयातें ॥ प्राप्त जाले गौतमी तें ॥ वास्तव्य केलें तेथें ॥ मास परियंत ते ठायीं ॥ ७० ॥
तंव तो पुरुषोत्तम मास ॥ सकळ जाणूनी जन जाती स्नानास ॥ आपणही उठत बैसत जातसे ॥ सर्वांमागे स्नानासीं ॥ ७१ ॥
आधींच गौतमी पवित्रता ॥ वरी मलमास प्राप्त होतां ॥ तें पुण्य न भूतो न भविष्यता ॥ वरी प्राप्तता सत्संग ॥ ७२ ॥
एक गंगाबिंदु झगटतां शरीरीं ॥ तात्काळ होय पापाची बोहरी ॥ संत ब्राह्मण सेवा तयावरी ॥ हे तो अधिकाधिक होय पैं ॥ ७३ ॥
एतत्तालतमालसलसरलव्यालोलवल्लीलता ॥ छन्नं सूरकरप्रतापरहितं शंखेंदु कुंदोज्वलं ॥ ५ ॥
गंधर्वामर सिद्धकिन्नरवधूतुंगस्तनस्फालितं ॥ स्नानाय प्रतिवासरं भवतु मे गांगं जलं निर्मलं ॥ ६ ॥
ऐसा शूद्र स्नान करितसे ॥ वरी ब्राह्मणांचे चरणतीर्थ प्राशीतसे ॥ तेंची स्वयें शरीरा लावितसे ॥ तें तीर्थ गंगोदकेंसी ॥ ७४ ॥
ऐसा नेम एक मासवरी पूर्ण ॥ आचरला तो शूद्र जाण ॥ तंव नवल जालें तेच क्षण ॥ मासगणना संपूर्ण होतां ॥ ७५ ॥
तयाचा कुष्ट जाऊनि पाहे ॥ शरीरीं जाला दिव्य देहे ॥ मना चोज मानिताहे ॥ म्हणे नवल काय हें जालें ॥ ७६ ॥
या व्याधीमुळे बहुत ॥ द्रव्य वेंचलें अपरिमित ॥ परी व्याधी नव्हे शांत ॥ तो स्नानेंच निःपात जाहला ॥ ७७ ॥
चमत्कार पाहोनि अद्भुत ॥ मग तेथेंच बैसला हेत ॥ मग हर्षभरित होऊन तेथे ॥ उद्यापनातें करितसे ॥ ७८ ॥
ब्राह्मण संतर्पण यथाविधीं ॥ घृतपाचित अन्नें संपादी ॥ नानास्नानदानाचा विधी ॥ विप्रा करीं अर्पितसे ॥ ७९ ॥
त्रैत्रीणिदशक ॥ अपूप करून घृतपाक ॥ ते कांस्यपात्री निक्षेपून देख ॥ वायन देत विप्रातें ॥ ८० ॥
सआज्येंसी तें तंव वाण ॥ वरी शक्तिनुसार घालुनि सुवर्ण ॥ दक्षिणेसहित देतसे दान ॥ भावें जनार्दन स्मरोनी ॥ ८१ ॥
ऐसें उद्यापन करूनिया ॥ उल्हासेसी राहिला त्याच ठायां ॥ नित्य स्मरोनि केशवराया ॥ स्नान सारी गंगोदकीं ॥ ८२ ॥
समूळ पाप लेश झडला ॥ आणि कुष्टही समूळ गेला ॥ तंव तो समीप काळ पातला ॥ विप्र देखतां तयातें ॥ ८३ ॥
ते विष्णुदूत येऊनि ॥ तात्काळ वाहिला विमानीं ॥ ऐसी स्नानाची अगाध करणी ॥ पावला निर्वाणीं मोक्षातें ॥ ८४ ॥
कोटि पापाचा क्षय करूनीं ॥ काया कष्टविली तीर्थसेवनीं ॥ ऐसें पुण्य आचरोनी ॥ पावला निर्वाणीं मोक्षातें ॥ ८५ ॥
आधीं अर्पावें मग पावावें ॥ जैसें द्यावें तैसें घ्यावें ॥ शरीरीं कष्ट भोगावे ॥ मग पावावें सुखातें ॥ ८६ ॥
जैसें वेव्हारी देता धन ॥ अथवा सवाईसी धान्य ॥ तें व्याजासहित येत परतून ॥ तेवी जाण हे गोष्टी ॥ ८७ ॥
भक्तिभावें अर्पितां आडका ॥ मी कदां न घेई फुका ॥ वश्य जालो भावा एका ॥ स्वपदीं निका नेईं तयातें ॥ ८८ ॥
ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ तो लक्ष्मीनें आकर्णिला ॥ तोचि तुम्हां श्रोतियांतें कथिला ॥ प्राकृत भाषेकरूनी ॥ ८९ ॥
आतां पुढें लक्ष्मी करील प्रश्न ॥ त्याचें उत्तर देईल जनार्दन ॥ तें परिसा श्रोतेजन ॥ अति आदरें करूनिया ॥ ९० ॥
श्रोता असलिया सादर ॥ तरी वक्तृत्वा हर्षनिर्भर ॥ म्हणोनि जोडूनियां कर ॥ वारंवार प्रार्थितो ॥ ९१ ॥
जैसे वृक्षमुळी घालितां उदक ॥ मग तो फोफावे अधिकाधिक ॥ तैसा श्रोतियां असलिया नेटक ॥ फोंफावें देखवाग्वल्ली ॥ ९२ ॥
इति स्वस्ति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ एकविंशतितमोऽध्याय गोड हा ॥ २१ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्याः ९२ ॥ श्लोकः ६ ॥
॥ इति एकविंशतितमोऽध्यायः ॥