Adhik Maas Katha Marathi Adhyay 25

अधिकमास माहात्म्य अध्याय पंचविसावा

 (Adhik Maas Marathi Adhyay 25, Purushottam Maas Marathi Adhyay 25)

Adhik Maas Katha Adhyay 25 Marathi

श्रीगणेशाय नमः ॥ ऐका भाविकजन सकळ ॥ मलमहात्म अतिरसाळ ॥ श्रवण केलिया तात्काळ ॥ झडे कलिमल निजनिष्ठें ॥ १ ॥

साक्षात लक्ष्मी नारायण ॥ तयाचा संवाद जाण ॥ येर लापनिका नव्हे जाण ॥ करा श्रवण भावार्थ ॥ २ ॥
विष्णुरुवाच ॥ श्रुणु सुश्रोणि वक्ष्यामि फलं यन्मलमासजं ॥ सर्वदा सर्व दानोत्थं फलं प्राप्नोति मानवः ॥ १ ॥
सर्वव्रताधिकोमासः सर्वदानाधिकोमतः ॥ सर्वेषामेवमासानमयमेवाधिकोमतः ॥ २ ॥
स्नानं दानं जपो होमः ॥ स्वाध्यायो हरितोषणं ॥ मलिम्लुचे प्रकर्तव्यमनंतं फलमाप्नुयात् ॥ ३ ॥

स्नानेनाथ व्रतेनाथ दीपदाने नवापुनः पूजनेन तु विप्रस्य तथा गोपूजनेनच ॥ ४ ॥
शुष्कार्द पातक घोरं पापसंघात्समुद्भवं ॥ संप्राप्ते मलमासेतु तत्सर्वयाति भस्मसात् ॥ ५ ॥

श्रीविष्णु साक्षात आपण ॥ लक्ष्मी ते म्हणे ऐक वचन ॥ मलमास परम पावन् ॥ करीं श्रवण शुभानने ॥ ३ ॥
सकळ तीर्थामाजी प्रयाग पूर्ण ॥ किंवा शस्त्रामाजी सुदर्शन ॥ वेदामाजी सामवेद जाण ॥ श्रेष्ठपण तयाते ॥ ४ ॥
व्रतामाजी एकादशी ॥ सप्तपुरीमाजी काशी ॥ उत्तम स्नान गंगेसी ॥ भागिरथीसी जेवी घडे ॥ ५ ॥
पुराणामाजी श्रीभागवत ॥ अर्थामाजी भगवद्गीतार्थ ॥ शास्त्रामाजी वेदांत निश्चित ॥ मासांत मलमास हा ॥ ६ ॥
यामाजी उत्तमोत्तम प्रकारीं ॥ संपूर्ण दानातें जो अंगीकारी ॥ सदा सर्वदा मनोच्छाव स्विकारीं ॥ तरीं जन्मफेरी निवारे ॥ ७ ॥
स्नान दान होम जप ॥ स्वाध्याय ऐसें जें तप ॥ मलमासीं करितां अमुप ॥ तरीं नासे पाप तयाचें ॥ ८ ॥
दीपदानादि विप्रसेवन ॥ भावें कीजे ब्राह्मण संतर्पण ॥ दानवस्तु कीजे दान ॥ तरीं पावे सदन तो माझे ॥ ९ ॥
तयाचे शुष्क अथवा घोर ॥ पातकाचा मी न करीं विचार ॥ भस्म करीं मी समग्र सत्वर ॥ नाहीं उशीर मजलागीं ॥ १० ॥
ऐसें वचन नारायणाचें ॥ आकर्णूनी लक्ष्मी वदे साचें ॥ स्वामिया महिमान याचें ॥ अधिकाधिक ऐकिलें ॥ ११ ॥
लक्ष्मीरुवाच ॥ हे स्वामी जनार्दन सर्वेश ॥ यथाशक्ति आचेरे जो दानास ॥ तरीं इतुकें पुण्य प्राप्त होय त्यास ॥ नवल वचनास वाटतसे ॥ १२ ॥
तरीं स्वाभाविक कवणाला ॥ शक्तिनुसार दानधर्म घडला ॥ कोण पावन कोण उद्धरला ॥ पाहिजे कथिला वृत्तांतु ॥ १३ ॥
ऐकूनि ऐसे उत्तर ॥ बोलता झाला सर्वेश्वर ॥ म्हणे कथानक परिकर ॥ श्रवण करीं शुभानने ॥ १४ ॥
ऐक कमळलक्षणे वरदे ॥ पुरातन इतिहास शुभदे ॥ अरुंधती आणि पार्वती संवादे ॥ सुखप्रद श्रवण करी ॥ १५ ॥
एकदा कैलासाप्रती ॥ जाती जाली अरुंधती सती ॥ नमोनियां पार्वती प्रती ॥ अनुवादा संतोषे ॥ १६ ॥
तंव तो मलमासाचा दिवस ॥ प्राप्त होतां त्या समयास ॥ अरुंधती वदे देवीस ॥ ऐक वचनास माझियां ॥ १७ ॥
तूं तंव जगत्रय जननी ॥ साक्षात आदि भवानी ॥ सदा वससी सन्निधानीं ॥ खट्‍वांगपाणी वश्य केला ॥ १८ ॥
कवण पुण्याचिया कोटी ॥ पूर्वि आचरलीस गोमटी ॥ ते मज निवेदी हातवटी ॥ बोलतां होटीं लाजे मी ॥ १९ ॥
मी तंव ऋषि भार्या सत्य ॥ तुजलागीं सर्व असावें श्रुत ॥ परि नेणतपणे असे पुसत ॥ न यावें कोपाते मजलागीं ॥ २० ॥
मासपक्ष वर्षे दिन ॥ कोठे नव्हे तुझे आगमन ॥ टाकूनियां कैलास भुवन ॥ कोठे न जासी शुभानने ॥ २१ ॥
वृद्ध भ्रतार सदांचा पाहीं ॥ भस्मोद्धारण सदा देहीं ॥ सुगंध द्रव्याची वार्ता नाहीं ॥ लवथवित गजचर्मे ॥ २२ ॥
उदक प्राशना तुंबिनीफळ ॥ भक्षावया पात्र नरकपाळ ॥ ऐसें असें परि त्रैलोक्य पाळ ॥ म्हणती अचळ अविनाशी ॥ २३ ॥
ऐशी अविनाश काशी ॥ कवण पुण्य जोडलें तयासीं ॥ ते कृपा करूनियां मजसीं ॥ संकलित अर्थासीं वदावें ॥ २४ ॥
ऐकून अरुंधतीचे वचन ॥ देवी करी हास्यवदन ॥ मग वदती जाली आपण ॥ गौरीरमण तोषकजे ॥ २५ ॥
पार्वत्युवाच ॥ अरुंधति यदा मात्रा एवं स्नेहेनतर्जिता ॥ भर्तुः समीपे वासल्याद्विनोदेनावभाषणात् ॥ ६ ॥
मग वदतसे पार्वती सती ॥ ऐके बाई अरुंधती भर्ता आमुचा भोळा पशुपती ॥ स्नेहे मजप्रती पाळीत ॥ २६ ॥
जेवीं पुत्रालागीं कृपाळू माता ॥ स्नेहवृद्धि प्रतिपाळिता ॥ तेवीं मातें भोळानाथ ॥ कृपा करीत स्नेहभरें ॥ २७ ॥
भ्रतारची कृपा परिपूर्ण ॥ असलिया दुजे नाठवे जाण ॥ माहेर नाठवे तिये लागून ॥ भ्रतार पूर्ण स्नेहाळू ॥ २८ ॥
नानापरी विनोदे रीती ॥ समयीं संतोषवी मजप्रती ॥ हे तंव पूर्वीची रीती ॥ तेही पद्धती वेगळीच ॥ २९ ॥
मी असतां पितृगृहीं ॥ कुमारीदशा प्राप्त देहीं ॥ ऎसें असतां एकेसमयीं ॥ दुर्वास आले भेटीसी ॥ ३० ॥
तपिया माजी शिरोमणी ॥ महाराज तो दुर्वासमुनी ॥ तेणें माझिया पितया लागुनी ॥ निवेदिली काहाणी ते ऐका ॥ ३१ ॥
मलमास महिमा परिकर ॥ मुनिरावो वदला अपार ॥ तेथेंचि मी होऊन तत्पर ॥ श्रवणरंध्री आकर्णिलें ॥ ३२ ॥
मग तेथेची बसला हेत ॥ मीही आचरें नित्यानित्य ॥ संपूर्ण साधिलेंसे व्रत ॥ पिता करवित उद्यापन ॥ ३३ ॥
तया पुण्यें करूनि जाण ॥ प्रसन्न झाला त्रिनयन ॥ अर्धांगी ठाव देई म्हणोन ॥ वदतां तथास्तु ऐसें म्हणे ॥ ३४ ॥
तोची व्रत प्रभावो फळला ॥ शंकरा ऐसा पति प्राप्त जाला ॥ मलमास महिमा परिकर ॥ न भूतो न भविष्यति ॥ ३५ ॥
ऐसें सांगतां पार्वती ॥ बोलती जाली अरुंधती ॥ म्हणे कृपा करून मजप्रती ॥ व्रत पद्धति निवेदी पैं ॥ ३६ ॥
मी व्रत संपादीन ॥ भावार्थे जाण आचरेन ॥ विनाव्रतें दानाविण ॥ निरर्थक जाण जन्म हा ॥ ३७ ॥
ऐसें बोलतां विनयवाणी ॥ ऋषिभार्या शिरोमणी ॥ मग बोलती जाली भवानी ॥ तेंची श्रवणीं परिसवूं ॥ ३८ ॥
पार्वती म्हणे शुभ कल्याणी ॥ ऐकहो माये साध्वी शिरोमणी ॥ मासामाजी प्रतिदिनी ॥ ऐक अरुंधती सुशीळे ॥ ३९ ॥
द्वादशी संक्रांती पाहीं ॥ त्या विभागिल्या मासाच्या ठायीं ॥ प्रतिमासातें पर्वे सर्वही ॥ पुण्यदेही आचरती ॥ ४० ॥
परी या मलमासाच्या ठायीं ॥ संक्रातिये ठावेचि नाहीं ॥ म्हणोन असकृत पाहीं ॥ म्हणती जाण निश्चयेंसी ॥ ४१ ॥
म्हणोन पर्वकाळ उत्तमोत्तम ॥ येथें कीजे दानधर्म ॥ तेणें योगें पार्वतीरमण ॥ निजधाम वैकुंठीं ॥ ४२ ॥
येथें जे जे जैसें दान कीजे ॥ स्नानविधी आचरिजे ॥ तैसें तैसें फळ पाविजे ॥ सायास न करितां अनायासे ॥ ४३ ॥
ऐसे वाक्य वदतां गौरी ॥ येरी मागुती नमस्कारी ॥ मस्तक ठेवी चरणांवरी ॥ म्हणे कृपा करी स्वामिणीये ॥ ४४ ॥
तरी मलमहिमा अनुपम्य ॥ मज निवेदावा संपूर्ण ॥ तुम्हीं केले व्रत तेही जाण ॥ करावे कथन मजलागी ॥ ४५ ॥
स्वये मी अंगिकारीन ॥ तया व्रतालागीं आचरेन ॥ इतुके देई कृपादान ॥ करीं पावन जननीये ॥ ४६ ॥
ऐकोनि ऐसिया वचनाते ॥ उमा निवेदितसे तियेते ॥ म्हणे ऐकें संपूर्ण व्रतातें ॥ जें मी आचरलें भामिनी ॥ ४७ ॥
तेंची कथित्ये तुजलागूनी ॥ प्रात:काळीं स्नानातें सारुनी ॥ चंद्रमौळीतें नमस्कारुनी ॥ बैसे पूजनीं आदरें ॥ ४८ ॥
षोडशोपचारें पूजा समस्त ॥ साहित्येसी यथास्थित ॥ कांही न्यून पदार्थांत ॥ उणे पडो नेदी सर्वथा ॥ ४९ ॥
मग अश्वात्थातळीं आसन ॥ घालून बैसे निवांत मन ॥ तेथें गौरी पंचकाते स्थापून ॥ करी पूजन यथाविधी ॥ ५० ॥
गौरी पंचक माझिये मातेतें ॥ मज आंदण दिधलेसे तियेने ॥ करीतसे तेची मी पूजन ॥ भाव धरूनी अवधारीं ॥ ५१ ॥
पंचामृत पूजा सोपस्कारी ॥ नित्य पूजिती पंचगौरी ॥ धूपदीप पुष्पे नानापरी ॥ अर्पी निर्धारी पूजनी ॥५२ ॥
सौभाग्यादि वस्त्रे कज्जल ॥ अर्पि दक्षिणेसी फल तांबूल ॥ नैवेद्य षड्रस सुपरिमळ ॥ अर्पी निर्मळ भावार्थे ॥ ५३ ॥
ऐसी पूजा संपूर्ण मासवरी ॥ करितसे जाण मी सुंदरी ॥ मग उद्यापनाते स्वीकारी ॥ तेही परी अवधारी ॥ ५४ ॥
पाचारूनि विप्र पंचकाते ॥ सहदंपत्यासी तयाते ॥ वस्त्र अलंकारादि सहिते ॥ भोजनाते षड्रस ॥ ५५ ॥
ऐसे करितां उद्यापन ॥ विप्रे दिधले आशीर्वचन ॥ अक्षयी सौभाग्य नव्हे खंडण ॥ साधिले पूर्ण व्रतासी ॥ ५६ ॥
ऐसे संपूर्ण मासवरी जाण ॥ मौन्येची एकभुक्त करून ॥ व्रत साधिले संपूर्ण ॥ फलपूर्ण प्राप्त झाले ॥ ५७ ॥
ऐसे व्रत माझिया आनंदाचे ॥ तूंते निवेदिले आजी साचे ॥ जरी आचरसी नेमाचे ॥ फल तयाचे प्राप्त होय ॥ ५८ ॥
हे व्रत करिती ज्या नारी ॥ त्या पुत्र प्रसवती संसारी ॥ अक्षयी सौभाग्याची परी ॥ लाहे संसारी परिसा ते ॥ ५९ ॥
संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा ॥ अरुंधतीने आकर्णिला सौरसा ॥ नमोनि उमेच्या चरणरजसा ॥ पुसोनि गृहा पातलीसे ॥ ६० ॥
स्वगृहीं जाऊनियां त्वरें ॥ व्रतारंभ करितसे आदरें ॥ पूर्ण होतांच निर्धारें ॥ अखंड सौभाग्या ते पावली ॥ ६१ ॥
ख्याती जिची त्रिभुवनी ॥ पूजिती जीतें सुरवरमुनी ॥ या व्रताची ऎसी करणी ॥ तुजलागुनी कथियेली ॥ ६२ ॥
ऐसा इतिहास पाहीं ॥ लक्ष्मीप्रती वदे शेषशाई ॥ अरुंधती पार्वती संवाद पाहीं ॥ वदला स्वदेही नारायण ॥ ६३ ॥
तोची कथा भाग आघवा ॥ निवेदिला श्रोतिया सर्वां ॥ भावें करूनी आचरावा ॥ मग पहावा प्रत्ययो ॥ ६४ ॥
ऐसे हें गौरीपंचकव्रत ॥ पूजा करावी नेमस्त ॥ तेणें सौभाग्यवर्धन स्त्रियांस ॥ पावे निश्चित आदरेंसी ॥ ६५ ॥
आतां अविश्वास अंतरी ॥ ग्रंथी न धरावा निर्धारी ॥ तेची वर्णु आतां परी ॥ कथा बरी उत्तराध्यायी ॥ ६६ ॥
जे विश्वास न मानिती ग्रंथास ॥ तयाची व्यवस्था कैसी असे ॥ तेचि परिसा सावकाश ॥ पुढती प्रसंगास आदरें ॥ ६७ ॥
जें बोलिला स्वयें नारायण ॥ तेची कथूं श्लोकाधारे करून ॥ म्हणोनि न करावा अनुमान ॥ मानावे वचन दासाचे ॥ ६८ ॥
स्वस्ति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराण सारोद्धार संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ पंचविंशतितमोऽध्याय गोड हा ॥ २५ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्या ६८ ॥ श्लोक ६ ॥
 
॥ इति पंचविशतितमोऽध्यायः ॥

Featured Post

Kamika Ekadashi 2024 Date

Kamika Ekadashi 2024 : Significance and Rituals Kamika Ekadashi is an important observance in the Hindu calendar, dedicated to Lord Vishnu. ...